राज्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य-केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी

0

राजू म्हस्के

राज्याच्या सिंचनाचा प्रश्न महत्वाचा असून तो सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि गुजरात दरम्यान असणाऱ्या दमणगंगा- पिंजर प्रकल्पाचा करार अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पावर 25 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून  यामध्ये 90 टक्के वाटा केंद्राचा  तर 10 टक्के वाटा राज्याचा असणार आहे. या प्रकल्पामुळे समुद्रात वाहुन जाणारे पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होणार असल्याने मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. अशा प्रकारचे राज्यातील अनेक प्रकल्प पूर्ण करुन येत्या दोन वर्षांत 18 टक्क्यांवरील सिंचन 40 टक्क्यांवर नेणार  असल्याचे केंद्रीय जलसंपदा तथा रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.चित्तेपिंपळगांव येथील छत्रपती संभाजी राजे साखर कारखान्याच्या 17 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.  यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेब पाटील दानवे, आमदार सर्वश्री प्रशांत बंब, संदिपान भुमरे, लक्ष्मणराव पवार, अतुल सावे आदी उपस्थित होते.प्रधानमंत्री सिंचन योजनेविषयी बोलतांना गडकरी म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील 26 प्रकल्पाचे काम पूर्ण केले असून नवीन 55 प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या धरणांचे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कॅनॉल किंवा इतर व्यवस्था नाही अशा कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी नाबार्डकडून कर्ज घेऊन 70 ते 80 हजार कोटी रुपयांचे धरणांची कामे पूर्ण करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here