प्रकाश आंबेडकरांनी दिली माजी शिक्षणाधिकाऱ्याला उमेदवारी

0

लातूर : लातूर अनुसुचित जाती राखीव लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून माजी शिक्षणाधिकारी राम गारकर यांच्या नावाची घोषणा आघाडीच प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी (ता. चार) आयोजित सत्ता संपादन सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष भिंगे उपस्थित होते. या वेळी माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, महाराष्ट्र विकास आघाडीचे अण्णाराव पाटील, एम आय एमचे जिल्हाध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन, शिवानंद हैबतपूरे, संयोजक संतोष सूर्यवंशी उपस्थित होते.
लातूर मतदारसंघासाठी माजी शिक्षणाधिकारी राम गारकर हे आघाडीचे उमेदवार असतील. श्री. गारकर  यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांच्यापाठीशी सर्वांनी उभे राहून त्यांना विजयी करावे, असे आवाहनही श्री. आंबेडकर यांनी केले.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विचारले नाही. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन जाहिर सभा सुरु केल्या आहेत. वंचिताचा उत्साह, वंचिताचे हे बंड पाहून आता विचारायला येत आहेत. त्यांना आमच्यासोबत आघाडी करायची नाही तर वंचिताचे बंड मोडून काढायचे आहे. हे बंड मोडले तर पुन्हा उभा रहायला वेळ लागेल असे त्यांना वाटत आहे. आमचे हे बंड बदल घडवल्याशिवाय थांबणार नाही. राज्यात ४८ मतदारसंघात आघाडीचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. या उमेदवारात एकही प्रस्तापित उमेदवार नसेल. सर्व उमेदवार सामान्य असतील असेही श्री. आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here