तपासकामी मदतीसाठी लाच घेताना आजर्‍यात पोलीस हेड कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या जाळ्यात

0

आजरा (प्रतिनिधी) :

दाखल गुन्ह्यात तपासकामी मदत करणेसाठी अडिच हजाराची लाच घेताना आजरा पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शंकरराव देसाई (वय ५२) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबतची फिर्याद शंकर लक्ष्मण देसाई (रा. उचंगी) यांनी दिली. विलास देसाई यांच्यावर दोन वर्षापुर्वी गडहिंग्लज येथे लाच घेतल्याबद्दल कारवाई झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, शंकर देसाई यांची आई, मावशी, मामेभाऊ व मामी यांच्याविरूध्द १८ मार्च रोजी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास विलास देसाई यांच्याकडे होता. या गुन्ह्याबाबत मदत पाहिजे असल्यास अडिच हजार रुपयांची मागणी पोलीस देसाई यांनी तक्रारदार देसाई यांच्याकडे मंगळवारी (दि.२) केली. याबाबत शंकर देसाई यांनी गुरूवारी (दि.४) लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. विलास देसाई हे आजरा येथील पोलीस लाईनमध्ये अडीच हजाराची लाच घेताना रंगेहाथ सापडले. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतचा गुन्हा विलास देसाई यांच्यावर आजरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण, अपर पोलीस उपआयुक्त दिलिप बोरस्ते, पोलीस उपअधीक्षक गिरिष गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारूती पाटील, सहाय्यक फौजदार शाम बुचडे, पोलीस नायक शरद पोरे, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश माने, सुरज अपराध यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here