पोलिसांच्या मारहाणीनंतर गडहिंग्लज मधील तरुणाची मूत्रपिंडे निकामी ?

तरुण गडहिंग्लजमधील : यमकनमर्डी पोलिसांविरुद्ध बेळगाव पोलीस प्रमुखांकडे कुटुंबियांकडून तक्रार

0

प्रतिनिधी बेळगाव
बुगडीकट्टी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील एका तरुणाला पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर त्याची मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे केलेल्या तक्रारीत असा गंभीर आरोप केला असून तरुणाच्या दयनीय अवस्थेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गृहमंत्री एम. बी. पाटील, राज्य पोलीस महासंचालक, बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनाही या तक्रारीच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत. सागर रुद्राप्पा कांबळे (वय ११, रा. बुगडीकट्टी)असे त्या तरुणाचे नाव असून सध्या कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
या संबधी सागराचे चुलते रामा शिवाप्पा कांबळे (वय ३५) यांनी जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. २७ डिसेंबर २०१८ रोजी यमकनमर्डी पोलिसांनी सागराला चोरी प्रकरणाच्या चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतले होते. त्याला हिडकल डॅमजवळील सरकारी विश्रामधाम येतेच ठेवून त्याला बेदम मारहाण केली आहे.
कुटुंबीयांकडे पैशाचीही मागणी
यासंबंधी सागराच्या कुटुंबीयांनी यमकनमर्डी पोलिसांकडे चौकशी केली असता दीड लाख रुपये दिले तर तुमच्या मुलाला सोडतो. असे सांगून त्यांनी मोठी रक्कम मागितली. तितकी रक्कम देणे आमच्या हातून शक्य होणार नाही, असे सांगताच ४० हजार रुपयांना व्यवहार ठरला. सागर ज्या धाब्यामध्ये काम करीत होता त्या धाबा मालकासह आम्ही विठ्ठल नायक या पोलिसांकडे पोहोचलो. आमच्याकडे केवळ ३५ हजार रुपये होते. त्यावेळी पोलिसांनी शिवीगाळ करून धाबामालकाकडे ती रक्कम देण्यास सांगितली. त्यानंतर ३० डिसेंबर रोजी सायंकाळी यमकनमर्डी पोलीस स्थानकात आम्हाला सागराची भेट घडवून देण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.
सीआरपीसी कलम १०९ अन्वये सागरावर कारवाई करून त्याला हुक्केरी येथील तालुका दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. ४ जानेवारी रोजी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. कारागृहात असतानाच त्याला उलटी जुलाब सुरु झाला होता. सुटकेनंतर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले. तपासणीअंती त्याची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे ९ जानेवारी रोजी सायंकाळी सागराला कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर डायलेसिस करण्यात येत आहे.
या परिस्थितीला पोलिसच जबाबदार…
यमकनमर्डी पोलीस स्थानकातील विठ्ठल नायक व आणखी चौधा पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे सागराची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून त्याच्या या परिस्थितीला यमकनमर्डी पोलिसच जबाबदार आहेत, असा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रामा कांबळे यांनी पोलीस प्रमुखांकडे केली आहे. सागराची आरोग्य स्थिती कशी आहे? यासंबंधी डॉक्टरांकडून माहिती घेऊन येण्याची सूचना पोलीस प्रमुखांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here