अर्धवेळ शिक्षकांना पुन्हा सेवेत समाविष्ट करुन घेणार – विनोद तावडे

0

मुंबई : अतिरिक्त ठरलेल्या अर्धवेळ शिक्षकांना पुन्हा सेवेत समाविष्ट करुन घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

अर्धवेळ शिक्षकांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्याबाबतचा प्रश्न सदस्य दत्तात्रय सावंत व अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, अर्धवेळ शिक्षकांनी बराच कालावधी सेवेत घालवला असल्याने त्यांना एकदम बाद करणे योग्य नसल्याने अशा ९१ अर्धवेळ शिक्षकांना पुन्हा सेवेत समाविष्ट करण्यात येईल.

शाळेचे समायोजन करताना कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही – विनोद तावडे

ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा शाळा समायोजित करण्यात आल्या आहेत. शाळा समायोजित करताना शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यासंदर्भातील प्रश्न सदस्य बाळाराम पाटील यांनी व अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, २० पटसंख्येच्या खाली असलेल्या शाळा बंद करण्याबाबत निर्णय पूर्वी घेण्यात आला होता. परंतू पहिल्या टप्प्यात १० पटसंख्येपेक्षा कमी असलेल्या ५६८ शाळा समायोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक व स्पर्धात्मक वातावरणात शिक्षण मिळावे हा शाळा समायोजित करण्यामागचा उद्देश आहे. समायोजित केलेल्या शाळातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत आहे. शाळेच्या समायोजनामुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बंद होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त आहे, अशी कोणतीही शाळा समायोजित करण्यात आलेली नाही. चुकीच्या पद्धतीने शाळांचे समायोजन करण्यात आले आहे, असे वाटत असल्यास अशा शाळा सदस्यांनी नावानिशी दिल्यास त्याबाबत चौकशी करण्यात येईल. याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी व योग्य मार्ग काढण्यासाठी सभापतींनी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असल्याचे सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री कपिल पाटील, सुनील तटकरे, भाई जगताप, सतीश चव्हाण, प्रकाश गजभिये, आनंदराव पाटील यांनी सहभाग घेतला.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध लवकरच करणार – विनोद तावडे

माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध संदर्भातील प्रश्न सदस्य विक्रम काळे व अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री.तावडे म्हणाले, आकृतीबंध बाबतचा समितीचा अहवाल आला अाहे. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार केला असून सदर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here