परभणी मनपातील राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांचे राजीनामास्त्र

0

परभणी (प्रतिनिधी) :

परभणी ग्रामीणचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील बंड समोर आलं आहे. परभणी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण १८ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी १३ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या कोट्यातील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला हे पद देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी ऐन वेळेला पक्षाशी संबंध नसलेल्या अतिक इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच संतापले. त्यामुळे संतापलेल्या १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत.

अतिक इनामदार यांचा अर्ज भरण्याचा निर्णय बाबाजानी यांनी मनमानी करुन घेतला आहे. तसेच बाबाजानी हे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असताना परभणी शहरात मोठ्या प्रमाणावर दखल देत आहेत. पक्षाच्या नगरसेवकांनाच विचारात घेत नसल्याने आम्ही पक्षात का राहायचं? असा सवालही या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

एवढेच नाही तर बाबाजानी यांनी दाखल केलेला इनामदार यांचा अर्ज रद्द करावा, अशी मागणीही नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणी पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडे दाद मागणार असल्याचंही नगरसेवकांनी सांगतिलं.

तरी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शहरात निर्माण झालेली ही मोठी बंडाळी राष्ट्रवादीसाठी धडकी भरवणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here