`जलयुक्त शिवार` अभियानात औरंगाबाद विभागात उस्मानाबाद जिल्हा प्रथम

0

औरंगाबाद : औरंगाबाद विभागामध्ये सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकूण 1682 गावांची निवड करण्यात येऊन त्यामध्ये विविध कामांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांना विविध पुरस्कारासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने अंतिम निर्णय दिला असून त्यात विभागस्तरावर उस्मानाबादने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर द्वितीय पुरस्कार औरंगाबाद व बीड जिल्ह्यांना विभागून दिला आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसह विभागात गेल्या वर्षी जलसंधारणाची दर्जेदार कामे झाली आहेत. 2015-16 या वर्षात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची विविध कामे करण्यात आल्याने विभागातील सिंचन क्षेत्रात समाधानकारक वाढ झाली आहे. या कार्यक्रमाला गती देण्यासाठी अभियान काळात केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने उत्कृष्ट योगदानासाठी राज्य शासनाने विविध पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यानुसार विभागीय स्तरावरील द्यावयाच्या पुरस्काराचे स्वरुप पुरस्कार, पुरस्काराची संख्या, बक्षिसाची रक्कम अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे.

विभागस्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कारांतर्गत दोन गावे प्रती विभाग प्रथम क्रमांक रु. साडेसात लाख, द्वितीय क्र. रु. पाच लाख, दोन तालुके प्रती विभाग प्रथम क्रमांक रु. दहा लाख, द्वितीय क्रमांक रु. साडेसात लाख, दोन जिल्हे प्रती विभाग प्रथम क्रमांक रु.पंधरा लाख, द्वितीय क्रमांक रु. दहा लाख असे आहे. विभागीय स्तरावर जिल्हा- प्रथम उस्मानाबाद, द्वितीय औरंगाबाद व बीड (विभागून), तालुका – प्रथम कंधार (जि. नांदेड), द्वितीय खुलताबाद (जि.औरंगाबाद) व परळी (जि. बीड) (विभागून), गांव – प्रथम बेंबर (ता. भोकर, जि.नांदेड), द्वितीय शेवडी (ता.जिंतूर, जि.परभणी), पत्रकार – प्रथम बाबासाहेब शेषराव म्हस्के (दै.सकाळ, जालना), द्वितीय अशोक चिंचोले (सायं.दै.भूकंप, लातूर), तृतीय माधव संताजी अटकोरे (दै.उद्याचा मराठवाडा, दै.श्रमिक एकजूट समीक्षा, नांदेड), विभागातून प्रथम आलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यात जिल्हाधिकारी – विभागात प्रथम आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here