पराभव दिसू लागल्यानेच सुडाचे राजकारण : पवार

0

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :  जनतेने विश्वासाने सत्ता सोपवलेल्या मोदी सरकारने केवळ सुडाचे राजकारण केले असून, शेतकरी, तरुणांना देशोधडीला लावले आहे. आमच्या तरुणाईला घराबाहेर चौकीदार नव्हे, तर घराचा मालक आणि उत्तम शेतकरी बनवायचे आहे. त्यासाठी मोदी सरकारला उलथवून टाका,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बुधवारी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक आणि हातकणंगलेचे आघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रच्या प्रभारी सोनल पटेल, पीपल्स रिपब्लिकनचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

या सभेमध्ये पवार यांनी मोदींना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सोनल पटेल, प्रकाश आवाडे यांची उपस्थिती होती. पवार म्हणाले, ‘जगाचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. भारताशेजारील काही राष्ट्रांमध्ये हुकूमशाही येत असताना भारतामध्ये मात्र ही लोकशाही टिकवून ठेवण्याचे काम तुम्ही सर्वसामान्य माणसांनी केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देश वेगळ्या वाटेवरून नेण्याचे काम केले आहे. ज्यांनी मोदी यांना विरोध करण्याची भूमिका घेतली, त्या विरोधकांवर छापे टाकून सूड उगवला जात आहे. कनिमोळी, कमलनाथ, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी यांच्या अधिकाऱ्यांवर हे छापे टाकले जात आहेत. हे सुडाचे राजकारण सामान्य जनता सहन करणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्या बुधवारी सकाळी अकलूज येथे झालेल्या सभेचा दाखला देत पवार म्हणाले, की या सभेला व्यासपीठावर सगळेच साखर कारखानदार होते; परंतु त्या सभेत मोदी यांनी माझ्यावर ‘पवार नुसते साखर-साखर करतात,’ अशी टीका केली.

होय, मी साखर कारखानदारीच्या हिताचे रक्षण करणारा आहे; परंतु त्याचबरोबरीने गहू,तांदूळ पिकवणाºया शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेतली आहे. मी कोणत्याही कारखान्याचा संचालक नाही. परंतु उसाच्या चांगल्या जातीचे संशोधन करून शेतकºयांना अधिक उत्पन्न मिळवून देणाºया जगातील एका चांगल्या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी त्यांनी एअर स्ट्राईकवरून केले जाणारे राजकारण, नोटाबंदी, शेतकºयांच्या आत्महत्या अशा विविध प्रश्नांवरून मोदींना खडे बोल सुनावले.

राज ठाकरे यांचे ‘लाव रे…’
सभेत जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याच्या काही क्लिप्स दाखवल्या; परंतु त्याची गुणवत्ता चांगली नसल्याने त्यातील एक क्लिप सुरूच झाली नाही. त्यात खूप वेळ गेला. राज ठाकरे हे‘ नुसतं लाव रे…’ असे म्हणताच एका सेकंदात क्लिप सुरू होते इतक्या चांगल्या दर्जाचे प्रक्षेपण राष्ट्रवादीला करता आले नाही.

…पोरगी देत नाहीत पवार म्हणाले,
अमुक यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्हांला मत द्या, असे आता सांगितले जातेय. पण मुलगी दाखवायला गेल्यानंतर मुलाच्या बापाकडं बघून मुलगी देत नाहीत; तर मुलाकडे बघूनच मुलगी दिली जाते. त्यामुळे या प्रचाराकडे लक्ष देऊ नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here