डहाणूत बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा वाढता विरोध; कष्टकरी संघटनेने सर्वेक्षण रोखले

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-बुलेट ट्रेनला डहाणू तालुक्यात आदिवासी व शेतकऱ्यांचा ठिकठिकाणी विरोध वाढत असून आज (दि.८अ‍ाॅक्टो) रोजी होऊ घातलेल्या सर्वेक्षणसाठी डहाणु तालुक्यातील कोटबीजवळील वाघातपाडा व गिंभल पाडा गावातील शेतकऱ्यांनी ते हाणून पाडले. यापूर्वी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय व भुमीअभिलेख डहाणू यांना निवेदनाद्वारे विरोध नोंदवल‍ा होता.दि. ५ आॅक्टो. रोजी कोटबी गावातील ५० खातेदार शेतकऱ्यांच्या जमीनीला सर्वेक्षण नोटिस मिळाल्याने त्यांच्यावर शासनाच्या निर्दयीवृत्तीबद्दल संकट कोसळले. पोटाची खळगी भागविणार जमिनीचा एकमेव तुकडा बुलेट ट्रेन प्रकल्पात देण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यानंतर शनिवारीदेखील ग्रामस्थांचे सर्वेक्षणास विरोध करण्याचे सत्र सुरूच होते. शेतकरी व आदिवासींना उध्वस्त करणाऱ्या या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाविरुद्ध सर्वत्र बंडाचे निशाण फडकण्याची तयारी कष्टकरी संघटना करत असल्याने शासनाच्या महत्वाकांक्षी बुलेट प्रकल्पाविरुद्ध वातावरण तापण्याची शक्यता आहे.

डहाणूच्या पुर्व भागातील जमीन संपादन छुप्या पद्धतीने करण्याचे शासनाचे षडयंत्र असून एकेक गावाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. कोटबी गावात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यासाठी भुमी अभिलेख डहाणू यांनी शुक्रवारी कोटबीच्या ५० खातेदार शेतकऱ्यांना नोटिस बजावल्या होत्या.जमीन मालकाच्या संमतीशिवाय संयुक्त मोजणी होऊ शकत नाही.त्यामुळे ही मोजणी बेकायदेशीर असुन कोणत्याही प्रकारची भुमोजणीसाठी संमती नसल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

तालुक्यातील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेनसाठी जागा न देण्याचा निर्धार केला असुन आज सुमारे शंभर ग्रामस्थांनी भुमीअभिलेख डहाणू कार्यालयाला निवेदन देऊन सर्वेक्षणाला विरोध केला. प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी पुकारलेल्या या आंदोलनात कष्टकरी संघटना उतरली असून कष्टकरीचे नेते ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली डेहणेे, साखरे, गोवणे, वाघातपाडा, गिंभलपाडा या गावातील कार्यकर्ते व सभासद यांनी सर्वेक्षण यंत्रणेला जाब विचारला. तसेच या प्रकल्पाविरुद्ध मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला.त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास शेतकरी, आदिवासी व भूमीपुत्रांचा तीव्र विरोध आहे. जमीन सर्वेक्षणास आम्ही मनाई केली असतानाही भूमी अभिलेख कार्यालय डहाणूचे कर्मचारी, बुलेट ट्रेन प्रकल्पातील काही कर्मचारी व पोलीस यांनी वाघातपाडा आणि गिम्भलपाडा येथे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक ग्रामस्थांना देशीधडीला लावणारा हा प्रकल्प असल्याने आम्ही विरोध केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण करू दिले नाही. कष्टकरी संघटनेचा या प्रकल्पाला विरोध असून त्याविरुद्ध मोठे जनआंदोलन उभारणार. असल्याची माहिती कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष ब्रायन लोबो यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here