अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभाग आणि जॅान्सन ॲण्ड जॅान्सन यांच्यात करार-आरोग्यमंत्री

जाणीवजागृती आणि आशा व एएनएम यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार

0

मुंबई :  आरोग्य विभाग आणि जॅान्सन ॲण्ड जॅान्सन यांच्यात आज राज्यातील आरोग्य क्षेत्रामध्ये क्षयरोग, माता व बाल मृत्यू यासंदर्भात जाणीवजागृती आणि आशा व एएनएम यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार आरोग्य मंत्री डॅा. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यासंदर्भात माहिती देताना आरोग्य मंत्री डॅा. सावंत म्हणाले की, राज्यातील खाण कामगार व त्यांच्या कुटुंबियांना होणाऱ्या क्षयरोगाबाबत प्रचार व प्रसार आणि उपाय योजना करण्यासाठी जॅान्सन ॲण्ड जॅान्सन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला मदत करणार आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये अर्भक  व माता मृत्यू दर जास्त आहे.

अशा जिल्ह्यांमधील परिचारीका आणि आशा कार्यकर्ती यांना नवजात अर्भकाची काळजी, गोल्डन-मिनीटमध्ये त्याला मिळणारा उपचार यासंदर्भात जॅान्सन ॲण्ड जॅान्सन आरोग्य विभागाच्या मदतीने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. गरोदरपणात होणारे संसर्गजन्य आजार यासंदर्भातही जनजागृतीची मोहिम हाती घेण्यात येणार आहे.

एएनएम व आशा कार्यकर्ती या गाव पातळीवर राहून रुग्ण सेवेचे काम करीत असतात. त्यासाठी त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे. दोन वर्षांचा हा करार असून, तो यशस्वीरित्या राबविण्याकरिता तातडीने कृती आराखडा तयार करावा, असे निर्देशही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यात सुमारे 10 हजार एएनएम व 60 हजार आशा कार्यकर्ती आहेत. यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करताना, प्रशिक्षण हे जिल्हा अथवा विभागीय पातळीवर देण्यात यावे, मात्र प्रात्यक्षिक देताना ते राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये असणारे ‘नवजात अर्भकांसाठीच्या अतिविशेष दक्षता  कक्षात’ प्रशिक्षण देण्यात यावे, जेणेकरून तेथे होणारा जंतूसंसर्ग कशा प्रकारे टाळता येईल याबाबत त्यांना मार्गदर्शन मिळेल.

या सामंजस्य करारांतर्गत जॅान्सन ॲण्ड जॅान्सन रुग्णालयातील जंतू संसर्ग, शस्त्रक्रिया गृहातील संसर्ग याबाबत देखील जाणीव-जागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here