झालं गेल विसरून जावा, एकसंघ होऊन कामाला लागा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे आवाहन

0

प्रतिनिधी कोल्हापूर :
एकमेकाला हात देण्यापेक्षा यापूर्वी आपण एकमेकांच्या पायात पाय घातले. त्यामुळेच आपला पराभव झाला. आता झालं गेल विसरून एकसंघ रहा आणि कामाला लागा. हा जिल्हा काँग्रेसचा होता आणि काँग्रेसचाच राहील. भविष्यात दोन खासदार आणि दहा आमदार काँग्रेसचेच असतील असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
रविवारी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. ६ फेब्रुवारीला पक्षाच्या महासचिव सोनल पटेल यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्ष निरीक्षक प्रकाश सातपुते होते.
आवाडे म्हणाले, गेल्या चाळीस वर्षात काँग्रेसचे सर्व चढ उतार मी पहिले आहेत. काँग्रेस हा मजबूत पक्ष आहे. मधल्या काही काळात वादळे आली असली तरी आता एकमेकांच्या चुका न दाखवता, दुरुस्तीची बहुमूक आपण घेतली आहे. पहिल्यांदा आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र येऊ, त्यानंतर तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू, आपण एकमेकांकडे बोट न दाखवता काम केले तर अवघड काहीच नाही. हा जिल्हा काँग्रेसचा होता, आणि काँग्रेसचा राहील. त्यासाठी सर्व सहकाऱ्यांच्या परिश्रमाची गरज आहे. पक्षासाठी वेळ द्या आणि कामाला लागा. सोशल मीडियाचे महत्व वाढत असून आपल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरही कार्यरत झाले पाहिजे. बचवात्मक भूमिका सोडून आक्रमक व्हा. काँग्रेसने साठ वर्षात काय केले आणि भाजपने साडेचार वर्षात काय केले याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा. काँग्रेसच्या बाजूने कोणीही धनदांडाने नसून गोरगरिबांनीच नेहमी साथ दिली आहे. त्यामुळे तळागाळात जावा आणि पक्षाची भुमीका सांगा. काँगेसने मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किती जागा वाट्याला येणार, कोण उभारणार याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतीलच. पण पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याची सांघिक जबाबदारी घेऊन सर्वांनी काम करायचे आहे.
यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, सुरेश कुऱ्हाडे, बंडा माने, अमर गोडसे, हिंदूराव चौगुले, शंकर पाटील, जयसिंग हिर्डेकर, शिवाजी कांबळे, महंमद शरीफ शेख, भगवान जाधव आदी उपस्थित होते.
प्रियांका गांधींची बदनामी करणाऱ्यांचे पुतळे जाळा
ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सरलाताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसच्या सरचिटणीसपदी प्रियांका गांधींची निवड होऊन त्या पक्षात सक्रिय होताच अत्यंत हिन पातळीवर जाऊन त्यांची बदनामी केली जात आहे. जो बदनामी करणार आहे, त्याच्या घरी आई, बहिण आहे की नाही ? त्याने मातृत्वाचा अपमान केला आहे. प्रियांका गांधींची ही बदनामी खपवून घेणार नाही. यापुढे बदनामी करणाऱ्यांचे पुतळे जाळले जातील.
६ फेब्रुवारीला सोनल पटेल कोल्हापूर दौऱ्यावर काँग्रेस पक्षाच्या महासचिव व पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल या ६ फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये पटेल या काँग्रेस कमिटीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here