कोकण किनारपट्टीवरून मासे गायब

0

मुंबई :

समुद्रावरील वाऱ्याचा वेग गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्यानंतरही मासे मिळत नसल्याने येथील मच्छीमार धास्तावले आहेत. मात्र, नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कारणेही या परिस्थितीमागे असल्याचे चित्र पुढे आले आहे.

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा गेल्या आठवडय़ात कोकण किनारपट्टीला फटका बसला. ताशी ४० ते ५० किलोमीटरने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे सलग चार दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली. त्यामुळे सुमारे एक कोटीचे नुकसान सहन करावे लागले. या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून वाऱ्याचा वेग मंदावल्याने मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली, पण समुद्रात फारसे मासेच मिळत नसल्याने मच्छीमार चिंतेत आहेत.

रत्नागिरी जिल्हा पर्ससिन असोसिएशनचे अध्यक्ष सुलेमान मुल्ला म्हणाले की, वाऱ्याचा जोर कमी झाल्यामुळे सोमवारपासून बोटी समुद्रात जायला लागल्या, पण डिझेलचा खर्च भरून निघण्याइतकीसुद्घा मासळी सध्या मिळत नाही. कर्नाटकातील होन्नावर-भटकळपर्यंत हीच स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

जाणकारांच्या मते, एलईडी दिव्यांच्या तीव्र प्रकाशझोतात अनिर्बंध मासेमारी आणि इतर माशांना पळवून लावणाऱ्या ट्रीगर फिशमुळे मच्छीचा तुटवडा जाणवत आहे. समुद्रातील बदललेल्या प्रवाहामुळे खोल समुद्रातील या माशांनी राज्याच्या सागरी परिक्षेत्रात येऊन धुमाकूळ घातला. त्यांची चाहूल लागताच अन्य मासे गायब होतात. त्यामुळे मत्स्योत्पादन घटल्याची माहिती सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयाने दिली.

मत्स्योत्पादन घटल्याच्या तक्रारीला दुजोरा देताना येथील सहायक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांनी सांगितले की, उत्पादनामध्ये नेमकी किती घट झाली आहे, हे आकडेवारीनिशी लगेच सांगणे शक्य नसले तरी यांत्रिक नौकाही फार काळ मासेमारी न करता परत येत आहेत. समुद्रात फार मासे मिळत नसल्याची माहिती त्यांच्याकडून मिळत आहे.

कारण काय?

पर्ससिन, मिनी पर्ससिन बोटींची बेकायदा मासेमारी आणि प्रखर झोत असलेल्या एलईडी दिव्यांच्या वापरामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमारी समितीचे अध्यक्ष खलील वस्ता यांनी केला. रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारीला बंदी आहे. मात्र, वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून तशी मासेमारी छुप्या पद्घतीने चालूच आहे. परवानाधारक मिनी पर्ससिन बोटींच्या दुप्पट बेकायदा बोटींची संख्या आहे. केरळ-कर्नाटकापासून परराज्यातील बोटींचा धुमाकूळ चालूच आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मत्स्य विभागाचीही पर्ससिनवाल्यांना साथ असल्याचा आरोप वस्ता यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here