नगर येथील कर्जतच्या निम्म्या जमिनींच्या सातबार्‍यावर नीरव मोदीचे नाव

0

प्रतिनिधी – पूनम पोळ

नगर –  निरव मोदी व त्याच्या कंपनीच्या नावाने कर्जत तालुक्यातील खंडाळा व कापरेवाडी या महसुली गावांच्या हद्दीत तब्बल २२५ एकर जमीन असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. यातील निम्म्या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर निरव मोदीचे नाव असून, उर्वरित सातबारा फायर स्टोन कंपनीच्या नावाने आहे. मोदीने मुंबई स्थित गोयल नावाच्या व्यक्तीकडून प्रत्येकी ५० हजार रुपये एकर याप्रमाणे ही जमीन खरेदी केली.

नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेत ११ हजार ३०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. इतरही काही बँकांना गंडा घालून हा हिरे व्यापारी परदेशात पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्या सर्व मालमत्तांवर टाच आणण्यास ‘ईडी’ने सुरुवात केली आहे.

सक्तवसुली संचालनालयाने फक्त जमीनच नाही, तर सोलर प्लँटही ‘सील’ केला आहे. मोदीच्या मालकीची फायर स्टोन डायमंड प्रा. लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या नावाने खंडाळ्यातील डोंगर परिसरात सोलर प्लँट उभारला आहे. सुरवातीला फक्त मोदीच्या नावे असलेली शेतजमीन चर्चेत आली.

खंडाळा येथे त्याच्या नावे २५ एकर जमिनीचा आठ-अ आहे. परंतु, त्यात खराबा जमिनीचा उल्लेख नाही. खराबा जमीन व त्याच्या मालकीची कंपनी, अशी सुमारे २२५ एकर जमीन खंडाळा व कापरेवाडी गावांच्या परिसरात आहे, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे. जमिनीचा व्यवहार करून देणार्‍या व्यक्तीकडेही ‘ईडी’ने प्राथमिक चौकशी केली असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here