प्रा. मंडलिकांना उच्चांकी मताने विजयी करण्यासाठी वचनबद्ध : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

चंदगड तालुक्यातील सेना-भाजप युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यास अलोट गर्दी.

0

चंदगड (प्रतिनिधी) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात देशातील शेतकरी महिला आणि कामगारांसाठी हजारो कोटी रुपयांच्या योजना निर्माण केल्या. देशाला स्थीर आणि भक्कम सरकार पंतप्रधान मोदीच देऊ शकतात. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापुरातून प्रा. संजय मंडलिक यांना राज्यात उच्चांकी मताने विजयी करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, अशी निःसंदिग्ध ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटिल यांनी दिली. कार्यकर्त्यांनो एकदिलाने प्रा. मंडलिक यांच्या विजयासाठी जिवाचे रान करा, असा आदेशही त्यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघात सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची अलोट गर्दी झाली होती. स्वागत व प्रास्तविक भाजपा नेते रमेशराव रेडेकर यांनी केले.

मंत्री पाटील म्हणाले, राज्यात सेना-भाजप युतीचे सर्व ४८ उमेदवार निवडून आणा असा आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे. पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर हे लक्ष्य गाठायचे आहे. कार्यकर्त्यांनी त्यासाठी जीवाचे रान करावे. प्रा. मंडलिक यांना राज्यात उच्चांकी मताने विजयी करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. देशासाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या योगदानाची परतफेड ४०० खासदाराच्या विजयाने करूया, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, “प्रा. मंडलिक राज्यातील बहुचर्चित मतदारसंघाचे उमेदवार आहेत. ते भाग्यशाली आहेत कारण युतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून होत आहे. तीस वर्षानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमताचे सरकार केंद्रात आले आहे. ‘आबकी बार चार सो पार ‘ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे काम करावे. जिल्ह्यात आता परिवर्तन दिसत आहे. अनेकांचा धनुष्याला हात आहे.

महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची कामे केली. त्यांचा वसा आणि वारसा घेऊन निवडणूक लढवत आहे. चंदगडच्या जनतेने मला मागील निवडणुकीत १८ हजाराचे मताधिक्य दिले होते. गेल्या पाच वर्षात चंदगड तालुक्याच्या सर्व प्रश्नांचा आढावा घेतला आहे. लोकसभेला संधी द्या तुमची सर्व विकासकामे पूर्ण होतील.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी शिवसेनेला मताधिक्य मिळेल असा आशावाद व्यक्त करून चंदगडच्या त्रिकोणी विकास आराखड्यासाठी चंद्रकांत दादा सह प्रा. मंडलिक यांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

चंदगडचे शिवसेनेचे युवा नेते संग्राम कुपेकर म्हणाले, “केंद्र व राज्यात युतीच्या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या आहेत.

भाजपचे नेते गोपाळ पाटील म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा नाव जगभर दुमदुमत आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षांत मोदीच पंतप्रधान राहतील. त्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करा. ”

प्रा. सुनील शिंत्रे, म्हणाले, सेना-भाजपच्या काळात चंदगडमधील सिंचन प्रकल्प मार्गी लागले. मात्र काँग्रेसच्या काळात हे प्रकल्प रखडले. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सेना-भाजप युती विजयी झाली पाहिजे. यावेळी कृष्णात वाईंगडे, प्रभाकर खांडेकर यांनी मनोगते व्यक्त केली.

मेळाव्यास भैयासाहेब कुपेकर, बाळासाहेब कुपेकर, गोकुळचे संचालक बाबा देसाई, जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोलेकर, अनिता चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे, चंद्रकांत जांगनुरे, किरण पाटील, मार्कंड जरळी, नामदेव पाटील, चेतन बांदिवडेकर, अनिल दळवी, सचिन पिळणकर, योगेश कुडतरकर, राजू पाटील, संदीप नांदवडेकर, सुधीर भाऊ देशपांडे, रणजीत सावंत, दिलीप माने, गोविंद पाटील, सरपंच रामू पारसे, माजी जि.प. सदस्य भरमान्ना गावडा, संज्योती मळवीकर यांच्यासह चंदगड तालुक्यातील सेना भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here