डिजिटल व्यवहार करतांना सजगता बाळगणे आवश्यक

सायबर जनजागृती कार्यशाळेत अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे आवाहन

0

जळगाव : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहारामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. डिजिटल व्यवहार करताना आपली फसवणुक होऊ नये यासाठी समाजातील प्रत्येक नागरीकाने सजगता बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी केले.

ट्रान्सफॉर्मींग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत सायबर गुन्ह्याविषयी माध्यम प्रतिनिधींसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना श्री.सिंह बोलत होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अपर श्री.सिंह म्हणाले की, सन 2012 मध्ये राज्यात सायबर गुन्ह्यांची संख्या 521 होती. तर सन 2016 मध्ये ही संख्या 2380 इतकी झाली आहे. यावरुन आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्य व्यक्तींना विविध प्रलोभने दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. या जगात मोफत काहीच मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागत असतो. यामुळे विश्वास न बसणाऱ्या जाहिरातींना बळी पडता डिजिटल व्यवहारात होणारी फसवणूक थांबविण्यासाठी डिजिटल व्यवहार करताना सजगता बाळगावी तसेच व्यवहार करतांना घ्यावयाच्या खबरादीची माहिती प्रत्येकाने करुन घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर करताना त्यासाठी वयाचे निर्बंध नसल्याने प्रत्येक पालकाने आपला पाल्य सोशल मीडिया वापरत असताना जाणते अजाणतेपणे काही चुकीच्या बाबी तर करत नाही ना यासाठीही दक्ष राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सहाय्यक निरीक्षक सागर शिंपी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देतांना सायबर गुन्ह्यांची ओळख, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, सोशल मीडिया, बॅकींग व इन्शुरन्स संदर्भातील गुन्हे, सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, सायबर गुन्हा घडल्यानंतर काय करावे, सायबर गुन्हे रोखण्याच्या उपाय योजना, नागरिकांची कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले.

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी सायबर जनजागृती कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद करताना माध्यम प्रतिनिधींनी आपल्या माध्यमांच्यामार्फत नागरीकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here