मोठया प्रमाणात पाणी वापर संस्था निर्माण होणे आवश्यक – जगदीश धोडी

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-आगामी काळात धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि वापरासाठी मोठया प्रमाणात पाणी वापर संस्था निर्माण होणे तसेच शेतकऱयांनी ७ नंबरचा फॉर्म भरून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी मनोर येथे आयोजित सिंचन आढावा बैठकीत केले.यावेळी व्यासपीठावर पालघर पाटबंधारे विभाग,कार्यकारी अभियंता निलेश दुसाने,शिवसेना पालघर तालुका प्रमुख जयेश पाटील,पं. स.सदस्य पांडुरंग गोवारी,तालुका कृषी अधिकारी पवार आणि वैती उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील सुर्या आणि वांद्री धरण लाभक्षेत्र गावातील सिंचनाच्या समस्या,नादुरुस्त कालवे तसेच आगामी रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी सोडण्याचे दृष्टीने आवश्यक उपाययोजना तसेच प्रत्यक्ष लाभक्षेत्रातील ग्रामपंचायत सरपंच,शेतकरी, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ उपाध्यक्ष जगदीश धोडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी शेतकऱ्यांनी शेती सिंचना संबंधित येणाऱ्या अनेक समस्यां आणि प्रश्न बैठकीत उपस्थित केले.नादुरुस्त कालव्यांची दुरुस्ती करून अस्तरीकरण करणे,गाळ काढून झाडे-झुडुपे साफ करणे,हालोली भागात कालव्यांवर झालेली अतिक्रमणे दूर करणे इत्यादी प्रमुख प्रश्न बैठकीत मांडण्यात आले.किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या कालव्यांची तातडीने दुरुस्ती करुन आगामी २०१८-१९ च्या रब्बी हंगामासाठी येत्या १ डिसेंबरला सुर्या आणि वांद्री धरणातून पाणी सोडण्याचे यावेळी बैठकीत निश्चित करण्यात आले.सूर्या डावा तीर कालव्याचा बोरशेती ते पोचाडे दरम्यानचा सुमारे १३ किमी क्षेत्रावरील वनजमिनीच्या अडथळ्याचा प्रश्न सुटल्याने येत्या काही काळात या भागातील अपूर्ण कालव्यांचा प्रश्न मार्गी लागून जवळपास २२०० हेकटर क्षेत्र सिंचनाखाली येऊन या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here