सरकारकडून शेतकर्‍यांची दिशाभूल; फक्त वीस हजार कोटींची कर्जमाफी – सुनील तटकरे

0

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील आजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. विधान परिषद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांनी सत्तेत असणारे भाजपा-शिवसेना सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. पुढे ते म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार कोटींची तरतूद पुरवणी मागणीद्वारे केल्याचे आज सरकारच्या वतीने सांगितले गेले. कर्जमाफीच्या एकूण ३४ हजार कोटींपैकी जर २० हजार कोटींची तरतूद केली गेली, मग उरलेल्या १४ हजार कोटींचे काय होणार ? बाकी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, याचे उत्तर आता सरकारने द्यावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
     पुढे ते म्हणाले सरकारने आधी जाहीर केलेली १० हजारांची उचल अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सरकारच्या दाव्या नुसार ज्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळाली असेल तर त्यांच्या नावांची यादी सरकारने जाहीर करावी असा टोला तटकरे यांनी लगावला. रोज नवनवे आदेश काढून शेतकऱ्यांचा बँकाचा संभ्रम वाढवला जात आहे. सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेनेतील मंडळी देखील कर्जमाफीची घोषणा खोटी असल्याचे सांगत असून सरकारमध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर एकवाक्यता नसल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here