राष्ट्रीय निवडणूक ज्ञान स्पर्धेत अहमदनगर राज्यात प्रथम

0

राजू म्हस्के

ठाणे व्दितीय तर उस्मानाबादच्या संघाला तृतीय स्थान

औरंगाबाद : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय निवडणूक ज्ञान स्पर्धेत राज्यस्तरावर अहमदनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. हा संघ आता देशपातळीवरील ज्ञान मंजुषा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार आहे. अहमदनगर संघाच्या चैतन्य मुरदारे, अवधूत पाटील यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याहस्ते स्पर्धेचे प्रथम बक्षीस चषक, स्मृतीचिन्ह देऊन आज गौरविण्यात आले.

हॉटेल अजंटा ॲम्बेसेडर येथील सभागृहात राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यांचे प्रत्येकी दोन असे इयत्ता नववी ते बारावीतील 72 विद्यार्थ्यांचा समावेश होता. या जिल्हानिहाय संघाच्या प्रश्न मंजुषा स्पर्धेत अंतिम फेरीत ठाणे, उस्मानाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याने धडक मारली. यामध्ये ठाणे संघाकडून अनिरुद्ध धात्रक, अभय माहोरे तर उस्मानाबादच्या संघात यशकुमार मुंडे, सरोज एकंडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

 शिक्षण, आरोग्य, विज्ञान, संगणक, राज्यघटना, कार्यपद्धती आदींसह सर्व विषयावरील विविध प्रश्नांचा समावेश स्पर्धेत करण्यात आला होता. औरंगाबाद, मुंबई, पुणे, अकोला संघापासून प्रश्न मंजुषा स्पर्धेला सुरूवात झाली. अंतिम फेरीत मात्र उस्मानाबाद, ठाणे आणि अहमदनगरच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. अंतिम फेरीत चुकीच्या उत्तराला उणे गुणपद्धतीचा अवलंब करण्यात आला. त्यानुसार अहमदनगरच्या चैतन्य आणि अवधूतने आत्माविश्वासाने स्पर्धेला समोर जात सावधपणे उत्तरे देऊन 30 गुण मिळविले आणि प्रथम क्रमांक पटकाविला.

डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी प्रश्न मंजुषा स्पर्धेचे कौतूक केले. सहभागींना जागरुकपणे राज्य, देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी या माध्यमातून प्राप्त झाल्याचे सांगितले. देशात अशाप्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच होत आहे. या स्पर्धेतील विजेते राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सजगता, जागरुकता आणि माहिती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील सहभागींनी राज्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा डॉ. भापकर यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, प्रत्येक राज्याराज्यात अशा प्रकारच्या स्पर्धा पार पाडल्या जात आहेत. लोकशाहीचे मूल्य, सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचा मोठ्याप्रमाणात उपयोग होणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेकडे उत्तम संधी म्हणून पहावे. जीवनात सामान्‍य ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असल्याने स्पर्धेत गुणात्मक दर्जा राखावा, असे आवाहनही श्री. राम यांनी केले. त्याचबरोबर स्पर्धेतील सहभागींना स्पर्धेला सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शनही केले.

स्पर्धेच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी स्पर्धेबाबत सर्व सहभागींना माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले. आभार श्री. मोहोड यांनी मानले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल यांचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here