नांदेडचा निकाल भाजपची लाट ओसरल्याची नांदी – नवाब मलिक

0

नांदेड महानगरपालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्यामुळे भाजपची लाट आता पुर्णपणे ओसरली आहे. देशात कमळ, राज्यात कमळ, मनपात कमळ, असे भाजपचे घोषवाक्य ठरले होते. हा भ्रम नांदडेच्या जनतेने धुळीस मिळवल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नांदेडच्या विजयाबद्दल त्यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले. तसेच नांदेडच्या जनतेचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅड. अमोल मातेले, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आणि क्लाईड क्रास्टो

‘पार्टी विथ डिफरन्स’ असा टेंभा मिरवणाऱ्या भाजपने नांदेड मनपाच्या निवडणूकीत सर्व नैतिकता बाजुला ठेवून, पैसा, शक्ती पणाला लावली होती. लोहा कंधारचे शिवसेना आमदार चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराचे प्रमुख झाले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आमचेच जास्त सदस्य निवडूण आल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत होते. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतला जो आकडा भाजपने दिला तो फसवा होता. नांदेडच्या मतदानावर परिणाम व्हावा, म्हणून खोटे आकडे देण्यात आले. तरी नांदेडच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.

रेल्वेमंत्री पियुष गोयल व कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांना मंत्रीपदावरून दूर करा – नवाब मलिक

द वायर या ऑनलाईन न्युज पोर्टलने बातमी दिल्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्या टेंपल इंटरप्रायजेस या कंपनीच्या वार्षिक उलाढालीत १६००० पटींनी वाढ झाली आहे. ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षाच्या मुलाने मंदिराच्या नावावर भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे.

माध्यमे जेव्हा एखाद्या कंपनीबाबत भ्रष्टाचाराची बातमी देतात, तेव्हा त्या कंपनीला खुलासा मागण्याचा अधिकार असतो. पण जय शहा यांच्या खाजगी कंपनीचा बचाव करण्यासाठी खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल समोर येत आहेत, याचाच अर्थ दाल मे कुछ काला असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. पीयूष गोयल हे रेल्वेमंत्री असण्याऐवजी जय शहा यांच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट असल्यासारखे बचाव करत आहेत.

जय शहा यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस लिमिटेडमध्ये घोटाळा झाला असल्यास ते चौकशीअंती समोर येईल, परंतु पीयूष गोयल यांच्यासह कायदे मंत्री रविशंकर प्रसाद आणि सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल कंपनीचे बाजुने उभे राहिले आहेत. सरकारचे कायदा विषयक सल्लागार असतानाही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल जय शहा यांचा खटला लढत आहेत. सॉलिसिटर जनरलपदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

तसेच जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत रेल्वे व कायदे मंत्री यांना  मंत्रीपदापासून दूर ठेवले पाहीजे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here