मोदी, शहा देशाला कलंक

0

 

इचलकरंजी : देश एकदा फसलाय. २०१४ साली दाखविलेलं स्वप्न वाईट होतं ते आता सोडून देऊ, पण दुसऱ्यांदा फसणार नाही याची खबरदारी घ्या. देशाच्या राजकीय क्षितिजावरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हाकलून लावा, असे कळकळीचे आवाहन करतानाच, जर ही मंडळी परत सत्तेवर आली तर देशातील लोकशाहीचा ढाचा नष्ट होईल आणि दहा-पंधरा लोकांच्या हाती देशाची सत्ता एकवटेल, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी रात्री येथील विराट जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.
काळा पैसा बाहेर काढणार म्हणून नोटाबंदी करणाºया भाजपकडे लोकसभा निवडणुकीत ओतण्यासाठी करोडो रुपये आले कोठून? काळ्या पैशांवर तुम्ही कोणत्या तोंडाने बोलताय,. अशी जळजळीत विचारणाही त्यांनी या सभेत केली.
महाराष्ट नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसतानाही राज ठाकरे यांनी येथे सभा घेऊन इचलकरंजी आणि आसपासच्या परिसरातून आलेल्या जनसमुदायास नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीने देशातील तमाम जनतेला फसवण्याचे काम कसे केले हे आपल्या भाषणातून तसेच व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून सांगितले. मोदी आणि शहा यांना आपल्या ठाकरी भाषेत खोटारडे, थापाडे, लबाड अशी विशेषणे लावून ठाकरे यांनी त्यांची अवहेलना केली. या मंडळींनी गेल्या पाच वर्षात केवळ थापा मारण्याचे , जनतेला फसविण्याचे काम केले. आपल्या कुटील कारभारातून देशातील लोकशाही संपविण्याचे तसेच अर्थकारण बिघडवण्याचे काम केले. उद्या हीच मंडळी परत सत्तेत आली तर लोकशाहीचा ढाचा संपुष्टात येईल. उद्या त्यांच्या विरोधात आंदोलन करायला लागलात तर तुम्हाला मारुन टाकतील. अ‍ॅडॉल्फ हिटलर ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने मोदी यांची वाटचाल सुरु आहे, असे ठाकरे म्हणाले.
ठाकरे यांनी आपल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात मोदी व शहा यांच्या एकूण पाच व्हिडीओ क्लिप दाखविल्या. प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देतो असे मोदींनी सांगितले तर शहा यांनी तो जुमला होता असे सांगून देशाच्या थोबाडीत मारले. ही माणसं तुम्हाला मुर्ख बनवून गेली. इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी कधीही पाहिला नाही, असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत योजनेसाठी कर गोळा केला जातो. पण भारत काही स्वच्छ झाला नाही. गंगा साफ करणार होते ती केली नाही, मग २० हजार कोटी रुपये गेले कोठे? परदेशातील काळा पैसा आणतो म्हणून सांगितले तो आणला नाही. किती वेड बनवायचं या माणसांनं? केसाने गळा कापला आहे. ज्या सैनिकांच्या नावाने आता ही मंडळी मते मागत आहेत, त्याच सैनिकांचा मोदींनी कसा अवमान केला हे एका व्हिडीओ क्लिपद्वारे ठाकरे यांनी दाखविले. सैनिकांपेक्षा जर व्यापारी धाडशी असेल तर मग जा ना तिकडे सिमेवर अंबानी आणि अदानीला घेऊन. द्या त्यांच्या हातात बंदुका आणि लढा म्हणाव त्यांना. एकीकडे जवानांचा असा अवमान करायचा आणि आता निर्लज्ज पणाने त्यांच्या नावाने मत मागतायत. मोदी व शहा हे देशाला लागलेला कलंक आहे, असे ठाकरे म्हणाले.
प्रारंभी युवराज यडुरे, गजानन जाधव, तानाजी सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, संदीप देशपांडे यांची भाषणे झाली. मोहन मालवणकर यांनी सूत्रसंचालन केले. राज ठाकरे यांचा चांदीची गदा देवून आणि पुष्पहार घालून स्वागत केले. राष्ट्रगीताने सांगता झाली. यावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, राजू पाटील, अभिजीत पानसे, यशवंत किल्लेदार, राजू दिंडोर्ले, आदी नेते उपस्थित होते.आसूड ठरले लक्षवेधीराज ठाकरे यांच्या सभेला सुरूवात होण्यापूर्वी सभेच्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आसूड आणले होते. मैदानातच कार्यकर्ते हे आसूड ओढून घेत असताना क्षणभर व्यासपीठातील मंडळीही कुतुहलाने पाहत राहिले. हे आसूड लक्षवेधी ठरले.
————-
इचलकरंजीचा वस्त्रोद्योग
महात्मा गांधी यांनी चरख्यावर सूत काढायला सुरू केले. त्याआधीच सन १९०४ साली इचलकरंजीकर सूत विणत होते, असा उल्लेख भाषणाच्या सुरूवातीला करून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच नॅनोच्या आधी सन १९७० साली इचलकरंजीच्या एका उद्योजकाने ‘मीरा’ ही छोटी कार निर्माण केली होती, त्याचाही उल्लेख केला.

पाच सेकंदाला सात शौचालये?
मोदींनी बिहार राज्यातील एका भाषणात सांगितले, आम्ही एका आठवड्यात ८ लाख ५० हजार शौचालय बांधले. याचा व्हिडीओ दाखविला. त्याचा हिशेब आम्ही पाहिला असता एका मिनिटात ८४ म्हणजेच ५ सेकंदाला सात शौचालये बांधले गेले, असा निघतो. एवढ्या वेळात माणसाचे होत नाही, तर शौचालय कसे बांधून होईल, असा सवालही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here