सत्तेचा गैरवापर करुन आकसाचे आणि सुडाचे राजकारण सुरु –  शरद पवार

0

चंद्रपूर  –  तीन वर्षात सत्तेचा गैरवापर करुन आकसाचे आणि सुडाचे राजकारण कसे करता येईल यावरच आत्ताच्या सरकारने जास्त लक्ष दिले आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रपूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. विदर्भ दौऱ्यादरम्यान आज चंद्रपूर येथे शरद पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले.

 राजीव गांधी यांच्या काळात बोफोर्स खरेदीप्रकरणी ठपका ठेवला होता. त्याप्रकरणाची चौकशी झाली आणि त्यातून ते बाहेरही आले होते. आज राजीव गांधी हयात नाहीत. मात्र तरीही हे प्रकरण उकरुन काढण्याचा प्रयत्न होतो आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात नवीन खटला दाखल केला आहे. याचा अर्थ राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांना भीती वाटायला लागली आहे. गरीबांसाठी सत्तेचा वापर करायचा आणि त्यासोबतच देशाला आधुनिकतेच्या वाटेवर न्यायचे असा आदर्श ज्यांनी ठेवला त्याच परिवाराची आज आकसाने बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण लोक जसे सत्तेवर बसवतात तसेच जर सत्तेचा दुरुपयोग केला तर पायउतारही करतात हे सत्य सत्ताधाऱ्यांना उमगलेले दिसत नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला.

 चंद्रपूर जिल्हयाबद्दल बोलताना या जिल्हयाचे नेतृत्व अशा व्यक्तीने केले ज्याचे नाव पूर्ण महाराष्ट्र आजही घेतो. सामान्य कुटुंबात जन्मलेले आणि सामान्यांचा विचार करणारे मारोतराव कन्नमवारसारखे नेते राज्याला लाभले. माझ्या तरुणपणी त्यांचा आदर्श माझ्यासमोर होता असे उदगार शरद पवार यांनी काढले.

 जिल्हयातील सरकारच्या दारुबंदीच्या दिखाव्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, दारुबंदीची नाटकं या जिल्हयात कशाला करता ? महिला भगिनींनी मागणी केली म्हणून दारुबंदी झाली. मात्र आता पूर्वीपेक्षा अधिक तेजीत दारुच्या व्यवसाय सुरु आहे. बंदी करायची असेल तर कायमची करा. अशी नाटकं करुन आया-बहिणींचे संसार उध्दवस्त करु नका असे आवाहन केले.

 या मेळाव्यामध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले . या मेळाव्याला माजी मंत्री रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार संदिप बाजोरिया, गुलाबराव गावंडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदिप गड्डमवार, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, मोरेश्वर टेंभुर्डे, बाबासाहेब वासाडे, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके तसेच पदाधिकारी व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here