फवारणीने किटक मरण्याऐवजी माणसं मरत आहेत मग ही कसली शाश्वत शेती- विधीमंडळ पक्षनेते अजित पवार

0

पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना सवाल…

 वर्धा मुख्यमंत्र्यांनी शाश्वत शेतीच्या नावाने मोठमोठया गप्पा मारल्या परंतु आम्हाला पदयात्रेमध्ये अनेक शेतकरी भेटले ज्यांना साधी विहिर किंवा शेततळ्यासाठी अनुदान मिळालेले नाही. जे किटकनाशक शेतीवरील किटक मारण्यासाठी वापरले जाते त्या किटकनाशकाने माणसे मरत आहे ही कसली शाश्वत शेती असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना केला.

 आज दुपारी अजित पवार यांची पत्रकार परिषद दापोर येथे पार पडली. यावेळी अजित पवार यांनी केंद्र आणि राज्यसरकारवर सडकून टिका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर आणि त्यांच्या खोटया आश्वासनांवर जोरदार हल्लाबोल केला.

पदयात्रेमध्ये अनेक शेतकरी आमच्याशी संवाद साधत आहेत परंतु कर्जमाफी झाली आहे असे  सांगणारा एकही शेतकरी या मार्गात भेटला नाही. कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत आहे.

 विदर्भामध्ये कापसावर बोंडअळीचे संकट आले आहे. परंतु सरकार या शेतकऱ्यांच्या मदतीला आले नाही. कुठल्याही शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सरकारकडून करण्यात आलेले नाहीत. गुजरातमध्ये निवडणूका डोळयासमोर ठेवून तिथे शेतकऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला. म्हणजे प्रत्येक गोष्ट निवडणूका डोळयासमोर ठेवूनच हे सरकार करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.

 अभ्यास,समिती आणि चौकशी एवढयावरच या सरकारचे काम सुरु आहे. कुठलाही घटक या सरकारवर समाधानी नाही. सरकारच्या अनेक खात्यामध्ये जागा रिक्त आहेत. विदर्भामध्ये तर शासकीय अनेक जागा रिक्त आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख कारभार व आदर्श प्रशासन दयायचे असेल तर अधिकारी वर्गाची आवश्यकता आहे. परंतु सर्वच क्षेत्रामध्ये हे सरकार भोंगळ कारभार करताना दिसत आहे.

 राज्यात १४०० शाळा बंद करणार आहेत. ठराविक लोकांची शिक्षणावर मक्तेदारी व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे असा आरोप अजित पवार यांनी करतानाच महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले,शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील,पंजाबराव देशमुख यांनी शाळा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर शरद पवार, वसंतराव नाईक यांनीही ग्रामीण भागात शाळा उभारण्यासाठी मदत केली. जर ग्रामीण भागात शाळा नसतील तर मुली लांबच्या शाळेत जाणार नाहीत. आज याच मुली सर्वात जास्त मेरीटमध्ये येत आहेत. शाळा बंद झाल्या तर या मुलींनी कुठे शिकायचे असा सवाल मुख्यमंत्र्यांना त्यांनी केला.

 ११ डिसेंबरला अधिवेशनामध्ये पहिल्यादिवशी आम्ही सरकारकडे राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आणि किती बॅंकांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली त्याची आकडेवारी मागणार आहोत. ही आकडेवारी दिल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

राज्यातील किती लोकांचा जीव गेल्यावर आणि किती शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त झाल्यावर सरकारला जाग येणार आहे असा संतप्त सवाल करतानाच या सरकारला जागं करण्यासाठीच ही हल्लाबोल पदयात्रा असल्याचे त्यांनी सांगितले .

 दरम्यान विदर्भात आमचे आमदार कमी आहेत. आम्हाला विदर्भामध्ये स्पेस दिसत आहे. त्यामुळेच विदर्भामध्ये जास्त लक्ष घातल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

 या पत्रकार परिषदेला खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार सुरेश देशमुख आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here