गडहिंग्लजच्या पाण्यासाठी मास्टर प्लॅन -प्रा. सुनिल शिंत्रे

0

गडहिंग्लज – केदारी रेडेकर फौंडेशनतर्फे गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यातील शेती आणि पिण्याचे पाणी याचा मास्टर प्लॅन करण्यात आला आहे. आगामी पाच वर्शाच्या काळात पाणी प्रश्नावरच काम करण्यात येणार आहे. रेंगाळलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पुर्ण करणे, उपलब्ध पाण्याचा योग्यप्रकारे वापर व्हावा यासाठी जलसाक्षरता चळवळ बळकट करणे आणि भविष्याचा विचार करुन या विभागासाठी 5 टीएमसी पाणी मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे अशा त्रिसुत्रीवर हा मास्टर प्लॅन करण्यात आला आहे. पाणी परिषदेचे निमंत्रक प्रा. सुनिल शिंत्रे यांनी ही माहिती दिली.
प्रा. शिंत्रे म्हणाले, हिरण्यकेशी घटप्रभा खो-यातील नदयांवर 7 टीएमसी पाणी साठा करण्यास मंजूरी आहे. 1972 साली मंजूर असलेल्या या पाण्यातील काही प्रकल्प अद्यापही पुर्ण झालेले नाहीत. काही प्रकल्प अंतिम टप्यात आहेत त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. परिषदेच्या व्यासपीठावर हा प्रश्न प्राधान्याने मांडून लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणार आहोत. नजीकच्या दोन वर्षात रेंगाळलेले तीनही प्रकल्प पुर्ण व्हावेत असा आमचा आग्रही पाठपुरावा राहणार आहे. या प्रकल्पाच्या पुर्ततेसाठी पुनर्वसनाचा पश्नही महत्वाचा आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्राधान्याने व्हावे असा आमचाही आग्रह राहणार आहे. पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी साठा होवू नये दोन्ही कामे एकाचवेळी पुर्ण व्हावीत अशी आमची अपेक्षा आहे.
उपलब्ध पाण्याचा वापर योग्यप्रकारे झाला पाहिजे यासाठी जलसाक्षरतेवर आम्ही प्रभावीपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीसाठी ठिबक पध्दतीचा अवलंब व्हावा यासाठी शेतक-यामध्ये जागृती करणार आहोत. गावोगावी असलेले पारंपारिक पाण्याचे स्त्रोत खुले करण्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे सहकार्य घेवून लोकसहभागातून ही कामे करणार आहोत. चालूवर्षी या तालुक्यात ओढया नाल्याचे पाणी अडवून प्रकल्पातील पाणी साठी वाढविण्याचा यशस्वी प्रयोग केला हाच कार्यक्रम सातत्याने राबविणार आहोत. जमिनीतील पाणी साठयात वाढ व्हावी यासाठी विहीरी आणि कुपनलिका पुनर्भरण कार्यक्रम व्यापक स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा यासाठी गावोगावी विद्यार्थ्यांच्या जनजाग्रण फे- या काढण्यात येतील. शाळा, महाविद्यालयात तज्ञांची व्याख्याने आयोजित केले जातील. जलसाक्षरता चळवळ म्हणूनच हा प्रश्न गांभीर्याने हाताळणार आहोत.
मास्टर प्लॅनमधील तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भविष्याचा विचार करुन नव्याने 5 टीएमसी पाण्याची मागणी करुन त्याचा पाठपुरावा करावा. शासनाकडे करणार आहोत हा मुद्दा पाणी परिषदेच्या व्यासपीठावर मांडणार आहोत. या विभागाच्या पाणी प्रश्नाचा विचार करताना गडहिंग्लज तालुक्याच्या पुर्व भागातील 20 खेडयांना पाणी उपलब्ध करण्यासाठी हिरण्यकेशीचे पाणी सायफन पध्दतीने नेण्याचा प्रकल्प थोडया खर्चाचा असला तरी त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 210 कोटीचा हा प्रकल्प आहे तो प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. परिषदेत त्याचा ठरावही करणार आहोत.
फौंडेशनने गेल्या पंधरा वर्षात वेगळवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम राबविले असले तरी आता पाणी प्रश्नावर काम करण्याचा निर्धार केला आहे. जनता आणि शेतकरी यांच्या जिव्हाळयाचा हा प्रश्न असल्याने पाच वर्षाचा मास्टर प्लॅन करुन काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी राजकीय पक्ष आणि संघटना यांचे पुर्ण सहकार्य आहे. राजकरण पलिकडे जावून पाणी प्रश्नाचा विचार सर्वांनीच करावा अशी आमची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका असल्याने सर्वांनीच त्याचे मनापासून स्वागत केले आहे आणि म्हणूनच 28 जानेवारीची पाणी परिषद सर्वार्थाने महत्वाची आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here