माणगाव परिषद शताब्दीवर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

‘राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या विचारांनी माणगाव येथे ऐतिहासिक परिषद झाली. या घटनेला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे मार्च २०१९ ते मार्च २०२० हे शताब्दी महोत्सव वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गुरुवार (दि. २१) रोजी डॉ. सुखदेव थोरात यांच्या व्याख्यानाने शताब्दी वर्षाची सुरुवात होईल. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाच वाजता ‘दलित वंचित समाजाची स्थिती आणि त्यापुढील आव्हाने’ या व्याख्यानाचा विषय असेल, अशी माहिती माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. विनय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. कांबळे म्हणाले, ‘शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करताना दर दोन महिन्यांत तीन व्याख्यानांची एक व्याख्यानमाला अशी वर्षभरात २० व्याख्याने होतील. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित चर्चासत्रे, शिबिरे व परिसंवादांचे आयोजन केले जाणार आहे. यांदरम्यान १९२० मध्ये झालेल्या माणगाव परिषदेच्या इतिहास लेखनाची पुस्तिका प्रसिद्ध करण्यात येईल. वर्षभर झालेल्या कार्यक्रमाची स्मरणिकाही यानिमित्ताने प्रकाशित होईल.’

कांबळे म्हणाले, ‘शताब्दी महोत्सव साजरा करताना ज्या नव्या समस्या, नवी आव्हाने उभी राहिली, परिस्थिती बदलती या सर्वांची उत्तरे शोधण्यात येईल. यासाठी वर्षभर चालणाऱ्या व्याख्यानांतून देशभरातील तज्ज्ञांना आमंत्रित केले जाईल. याची सुरुवात गुरुवारी डॉ. थोरात यांच्या व्याख्यानाने होईल. शुक्रवार (दि. २२) रोजी शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. कांबळे यांचे ‘वंचित समाजाच्या विकासाची समस्या’ या विषयावर शाहू स्मारक भवनात व्याख्यान होईल. शताब्दी महोत्सवाची सांगता २१ व २२ मार्च २०२० रोजी होईल. या दोन्ही दिवशी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांचे आयोजन केले आहे.’

पत्रकार परिषदेस राहुल ठाणेकर, प्रा. अशोक चोकाककर, आनंद राणे, प्रा. सिद्धार्थ पद्माकर, प्रा. ए. एम. कसबे आदींसह महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here