महात्मा फुले खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते – शरद पवार

0

पुण्यातील महात्मा फुले वाडयामध्ये पार पडला पुरस्कार कार्यक्रम…

 मुंबई दि. २८ महात्मा फुले यांनी शेतकरी हितासाठी,स्त्री शिक्षणासाठी,तसेच समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी काम केले.ते आधुनिक भारताचे,विज्ञानाचे पुरस्कर्ते होते.त्यांनी देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी ब्रिटीश सरकारकडे शेतमालाचे व दुधाचे संकरीत वाण निर्माण करण्याची मागणी केली होती. ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कैवारी होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे केले.

 आज पुण्यातील फुले वाडा येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या १२७ व्या पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता पुरस्काराच्या वितरण सोहळयाला शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी देशातील पिडीत व वंचित घटकांपर्यंत महात्मा जोतीराव फुले यांचे विचार पोहोचवले आणि त्यांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी या परिषदेची स्थापना केली. त्यामुळे या परिषदेचे योगदान महत्वाचे आहे.

 आज देशाच्या कानाकोपऱ्यात महात्मा फुले समता परिषद पोहोचली असून उत्तर भारतात या परिषदेचे कार्य वाढवण्याचे काम उपेंद्र कुशवाह करत आहेत. छगन भुजबळ आणि अखिल भारतीय समता परिषद यांच्या सततच्या लढयामुळे संसदेच्या प्रांगणामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभारला गेला आहे. महात्मा फुले यांचे समतेचे विचार जोपासण्याचे काम खासदारांच्या हातून घडावे हा त्यामागचा उद्देश होता. आधुनिक विज्ञानाचे पुरस्कर्ते,देशाला विकासाची दृष्टी देणारे महात्मा जोतीराव फुले यांचे विचार राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी मोलाचे आहेत असे प्रतिपादनही शरद पवार यांनी केले.

 शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी साखर शाळेला प्रोत्साहन देणारे डॉ.मा.गो.माळी यांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यांचा आज सन्मान केला ही गौरवाची बाब असल्याचेही शरद पवार म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here