राज्याला तापमानवाढीचा चटका

0

मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र राज्याच्या बहुतांश भागात कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम असल्याने दिवसा उन्हाचे चटके तीव्र होत आहेत. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून, मध्य महाराष्ट्रातही तापमान अधिक असल्याने हवेत उकाडा जाणवत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मराठवाडा विदर्भात मात्र राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले जात आहे. या ठिकाणी बहुतांश भागातील कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचले आहे. परभणी व नांदेडमध्ये ३९ अंशांपुढे कमाल तापमान आहे. विदर्भात अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आदी ठिकाणी कमाल तापमान ३९ अंशांपुढे गेले आहे. सरासरीपेक्षा हे तापमान २ ते ३ अंशांनी अधिक आहे.

दरम्यान, १६ आणि १७ मार्चला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या आठवडय़ापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी कमाल तापमानात झपाटय़ाने वाढ होत आहे. सध्या कोकण विभागातील मुंबई, सांताक्रुझ, रत्नागिरी आदी भागांमध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, कोल्हापूर आदी ठिकाणी तापमान ३५ अंशांपुढे आहे. सांगली, सोलापूरमध्ये अनुक्रमे ३७ आणि ३८ कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here