राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्ट्राला तीन पुरस्कार

0

नवी दिल्ली : दिव्यांगजन विषयावरील राष्ट्रीय शॉर्ट फिल्म स्पर्धेत महाराष्ट्रातील दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे, दिग्दर्शिका ज्योत्स्ना पुथरा आणि सीमा आरोळकर यांना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील सिरीफोर्ट सभागृहात सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचा दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि चित्रपट महोत्सव विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्यांग सशक्तीकरण लघु चित्रपट स्पर्धा-२०१७’ च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या सचिव जी. लताकृष्णराव सहसचिव डॉली चक्रवर्ती यावेळी उपस्थित होत्या. ‘सुगम्य भारत अभियान’ आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या विविध योजनांवर माहितीपट, लघुपट आणि टीव्ही स्पॉट या तीन गटात उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे येथील दंतवैद्यक तथा दिग्दर्शक डॉ. सुयश शिंदे दिग्दर्शित ‘अजान’ या लघुपटासाठी त्यांना गौरविण्यात आले. ४ लाख रूपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या लघुपटात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या दिव्यांगाना शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा उपयोगी साधने खरेदीसाठीच्या (एडीआयपी) योजनेच्या लाभाबाबत जागृती करण्यात आली आहे. कर्णबधीर असलेल्या १० वर्षीय सादीक या बालकावर एडीआयपी योजनेचा लाभ घेऊन कोकलियर ही शस्त्रक्रिया केल्याचे दर्शविण्यात आले आहे. सादिक हा कर्णबधीर असल्याने सकाळची अजान ऐकू शकत नाही यावर त्याचे आई वडील डॉक्टरांकडे घेऊन जातात.

मुंबई येथील ज्योत्स्ना पुथरा दिग्दर्शित ‘झेब्रा क्रॉसिंग’ या टीव्ही स्पॉटला प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. ५ लाख रूपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्योत्स्ना पुथरा दिग्दर्शित ‘डॉट’ या टीव्ही स्पॉटला यावेळी विशेष उल्लेखनीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला. मुंबई येथील सीमा आरोळकर दिग्दर्शित ‘धिस इज मी’ या टीव्ही स्पॉटला द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले. ३ लाख रूपये आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here