महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची घरवापसी?

0

मुंबई (प्रतिनिधी) :
लोकसभेची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला असून या पराभवाचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची चिन्हे आहेत. पाच वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात सामील झालेले नेते पुन्हा स्वगृही परतण्याची चिन्हे आहेत. अजित पवारांनीच याबाबतचे संकेत दिले असून मराठवाडा आणि खान्देश या पट्ट्यातील नेते स्वगृही परतण्याची चर्चा आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाला काँग्रेसना धक्का दिला आहे. तर त्याधी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव, कर्नाटकमधील सत्ताबदल आणि गुजरातमध्ये भाजपाचा निसटता विजय यामुळे भाजपासोबत गेलेले नेते सावध झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात सूचक विधान केले आहे.

अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, सरकारच्या कामकाजाबद्दल नाराजी दिसते. समाजातील प्रत्येक वर्ग आणि प्रशासनातील अधिकारीही सरकारवर नाराज आहेत. निकालानंतर भाजपात कोंडी झालेले लोकही बोलायला सुरुवात करतील, असे त्यांनी सांगितले. आता जी लोकं भाजपात गेली त्यांना गेल्या चार – साडे चार वर्षांमध्ये वापरण्यात आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अपेक्षित वागणूक देण्यात आली नाही. ती लोक आता बोलू शकतात. इतके दिवस त्यांना बोलायची सोय नव्हती. पण आता ते भाजपाविरोधात बोलू शकतात, असे सूचक विधान त्यांनी केले. भाजपातून नेते राष्ट्रवादीत येणार का?, या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

खान्देश आणि मराठवाडा या भागातील काही नेते भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत या नेत्यांनी घरवापसी केल्यास भाजपाला आगामी काळात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गळती रोखण्याचे आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here