मानवी अस्तित्वासाठी मधुमक्षिका पालन आवश्यक; आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय कार्यशाळेत प्रा. डॉ. वायकर यांचे प्रतिपादन

0

आजरा (प्रतिनिधी) :

मधमाशांसारख्या किटकांमुळे परागीभवन होऊन पिके व फळे उत्पादीत होतात. अशा मधमाशा पृथ्वीतलावरून नष्ट झाल्यास मानवाचाही नाश अटळ असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. बी. बी. वायकर यांनी आजरा येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा प्राणिशास्त्र विभाग, केंद्रीय मधुमक्षिका पालन, संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आलेल्या ‘मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान प्रसार’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. ‘खादी व ग्रामोद्योग’ (पुणे) च्या संचालिका डॉ. के. लक्ष्मी राव प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. वायकर म्हणाले, मधुमक्षिका पालन व्यवसाय मानवी अस्तित्वाशी निगडित आहे. त्यांच्याकडून होणारी परागीभवन प्रक्रिया थांबेल, तेव्हा पिके व फळांचे उत्पादनही थांबेल, बीजधारणा होणार नाही. परिणामी मानवाला खायला अन्नही मिळणार नाही. त्यामुळे मानव जातच पृथ्वीतलावरून नष्ट होईल. असे भविष्य सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांनीच केले होते. याचा प्रत्यय औरंगाबाद परिसरात आला. तेथील डाळिंबाच्या बागा ओस पडल्या होत्या, तेव्हा त्या भागांमधून मधुमक्षिका पालनाच्या पेट्या ठेवल्या गेल्या. त्यामुळे डाळिंब फळधारणा चांगली होऊन उत्पादनही वाढले आहे. मानवी अस्तित्वाशी निगडीत असलेल्या मधुमक्षिका पालन व संवर्धनाची म्हणूनच गरज असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.

डॉ. लक्ष्मी राव म्हणाल्या, आजच्या युगात मानवी अस्तित्व टिकविण्यासह शेतीपूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन व्हायला हवे. यासाठी खादी-ग्रामोद्योग प्रशिक्षण तर देतेच शिवाय ४० हजार रुपये किमतीच्या १० मधुमक्षिका पालन पेट्या अनुदानातून केवळ ८ हजार रुपयांना पुरविते. त्यानंतर मार्गदर्शनही करते. तेव्हा या योजनेचा लाभ घेऊन मधुमक्षिका पालनासह, एक जोड व्यवसाय, अधिक उत्पन्न आणि मानवी अस्तित्व राखण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री. मोमीन, जनता शिक्षण संस्था संचालक के. व्ही. येसणे यांचीही भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेस आरंभ झाला. स्वागत डॉ. विनायक आजगेकर यांनी, तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. एल. होणगेकर यांनी केले. यावेळी तालुका व परिसरातील शेतकरी, विद्यापीठातील अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार डॉ. अशोक बाचुळकर यानी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here