बाल हक्कांकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून पहा- डॉ. गव्हाणे

0

शाश्‍वत विकासाच्या मोड्यूलवर पत्रकारिता विभागात राज्यस्तरीय कार्यशाळा

 

बाल हक्‍कांच्या प्रश्नांकडे मानवतेच्या द‍ृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुणे येथील एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग तसेच एम. ए. मास कम्युनिकेशन आणि युनिसेफ यांच्या संयुक्‍त विद्यमाने ‘शाश्‍वत विकासाच्या उद्दीष्टांचे मोड्यूल’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. युनिसेफच्या महाराष्ट्राच्या प्रमुख संवादतज्ज्ञ स्वाती मोहपात्रा यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या कार्यशाळेला राज्यभरातील पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांना आदरांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी केले. राज्यातील सर्व विद्यापीठातील पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख प्रथमच एकत्र येत असल्याचे त्यांनी प्रस्ताविकात नमूद केले.

डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, भारतासारख्या देशात शाश्‍वत विकासाची उद्दीष्ट्ये पूर्णत्वाला आणणे खूपच आवश्यक आहे. आरोग्यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयात आपण जगाच्या खूप मागे आहोत. बालकांचे प्रश्‍न, गरोदर मातांचे प्रश्‍न, आहार यासह अनेक गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. माध्यमांनही याकामी सकारात्मक द‍ृष्टीकोन स्वीकारला तर निश्‍चितपणे शाश्‍वत विकासाची उद्दीष्ट गाठणे शक्य होणार आहे. पत्रकारितेचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि माध्यमे यांनी याकामी पुढाकार घेतला तर आपण निश्‍चितपणे मूलगामी काम करु शकू, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.

स्वाती मोहपात्रा म्हणाल्या, शाश्‍वत विकासाचे अनेक निकष आहेत. त्यामध्ये बालकांचा विकास, त्यांचे हक्‍क आणि अधिकार याला विशेष महत्व आहे. जागतिक पातळीवर याविषयी काम सुरु आहे. माध्यमांनी या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाकडे सकात्मक दृष्टीने पाहिले तर चित्र बदलू शकेल. यासाठी माध्यमांचे तज्ज्ञ, अभ्यासक, पत्रकारितेचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या प्रश्‍नाकडे अधिक सजगतेने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

युनिसेफचे संशोधक डॉ. मनिंदरसिंग सेठिया यांनी शाश्‍वत विकासाच्या उद्दीष्ट्यांचे मोड्यूलचे सविस्तर सादरीकरण केले. औरंगाबाद येथील रफिक झकेरिया सेंटरचे प्रमुख डॉ. शाहीद शेख, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दिपक शिंदे, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. टी. व्ही. दौड, वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अनिलकुमार राय, मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठ पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. मीरा देसाई, एमआयटी आयएसबीजेचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती ठाकूर, पुणे विद्यापीठ पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, पुणे विद्यापीठ मीडिया स्टडीजच्या प्रमुख डॉ. माधवी रेड्डी, युनिसेफचे राज्यातील संवादतज्ज्ञ तानाजी पाटील, माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, चंद्रशेखर वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, गोविंद गोडबोले आदी कार्यशाळेत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here