लोकसभा निवडणुकीचा बिगुल दोन दिवसात वाजणार?

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

२०१९च्या लोकसभा निवडणूकीचे बिगुल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक ही सात ते आठ टप्प्यांमध्ये घेतली जाऊ शकते. निवडणुकीची घोषणा या आठवड्याच्या शेवटी अथवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत राज्यातील निवडणूक आयोगांना पत्र देखील पाठवलं आहे. ज्यामध्ये २०१४च्या निवडणुकीच्या तुलनांमध्ये काही बदल करणे अपेक्षित असेल तर तशा सूचना मागवण्यात येत आहेत. लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळेत बदल करण्याची आवश्यकता वाटत असेल तर त्याबाबत कळवावे असेही पत्रात नमूद केले आहे.

मागील दोन आठवड्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तयारीला अंतिम रूप देण्याच्या तयारीला लागले आहे. राज्यातील निवडणूक कार्यालयांकडून आढावा घेण्यात आलेला आहे. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. आयोगाच्या सूत्रांनुसार सर्व तयारी पार पडल्यानंतर १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठीची घोषणा केली जाणार आहे. विद्यमान १६ व्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी संपत असल्याने त्या अगोदरची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल आणि मे महिन्यात मतदानाचे टप्पे पार पाडले जातील. लोकसभा निवडणुकासोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत. भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकाबाबत अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

मागील लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहता २००४ मध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. तेव्हा २९ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची घोषणा केली होती. २००९ मध्ये २ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा करून पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी १६ एप्रिल २००९ रोजी मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला होता तर शेवट १३ मे रोजी अखेरचा मतदानाचा टप्पा पार पडला होता. गेल्या लोकसभा निवडणुकींची घोषणा ५ मार्च रोजी करण्यात आली होती त्यावेळी ९ टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here