कुपेकरांनी लोकसभेत जावे आणि चंदगड विधानसभा मित्रपक्षाला द्यावा : विद्याधर गुरबे

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभेचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी व चंदगड विधानसभेची जागा मित्रपक्षांना सोडावी अशी मागणी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व गडहिंग्लज पं.स.चे उपसभापती विद्याधर गुरबे यांनी आज (दि.१५) रोजी पत्रकार परिषदेत केली. तसेच आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय असलेले गुरबे यांनी खासदार महाडिक यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

विधानसभेचे सभापती कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या पत्नी श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी मागील साडेचार वर्षांपासून चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व यशस्वीपणे केले आहे. बाबासाहेब कुपेकर यांनी गडहिंग्लज आणि चंदग़ड मतदारसंघाचे यशस्वीपणे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी मतदारसंघाचे अनेक प्रश्न सोडवले. त्याच धर्तीवर आ. संध्यादेवी कुपेकर यांनीही मतदारसंघामध्ये अनेक विकासकामे केली आहेत. ही कामे करताना त्यांनी पक्षीय अभिनिवेश कधीच बाळगला नाही. त्यांचे व्यक्तिमत्त्व अजातशत्रू असल्याने त्यांचे सर्व क्षेत्रांमध्ये आणि पक्षांमधील नेत्यांशी चांगले संबंध आहेत.
या उलट राष्ट्रवादीचे विद्यमान खा. धनंजय महाडिक यांच्या उमेदवरीबाबत सर्वसामान्य जनतेतही नाराजी आहे. आणि त्यामागे कारणेही तशीच आहेत कारण चंदगड मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कधी दौरे केल्याचे अथवा विकासकामांसाठी चर्चा केल्याचे दिसून येत नाही. मागील निवडणूकीत आघाडी धर्म पाळल्यानेच ते विजयी झाले. मात्र, याचा त्याना विसर पडला आहे. त्यांनी सातत्याने मित्रपक्षाच्या खच्चीकरणाचे आणि स्वतःच्या पक्षालाही त्रास देण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक पदे वाटण्यात आली आहेत. अशा खासदारांचा आघाडीधर्म पाळून प्रचार करणे कार्यकर्त्यांना अवघड जाणार आहे.
त्यामुळे आ. संध्यादेवी कुपेकर यांना आघाडीतर्फे उमेदवारी दिल्यास दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करतील,आमदार संध्याताई कुपेकर या सक्षम महिला आहेत व त्यांच्या रूपाने पक्षाला चांगला पर्याय उपलब्ध आहे मुळातच त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत यामुळे सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभे राहतील यात शंका नाही त्यामुळे त्या संसदेत निवडून जातीलच शिवाय चंदगड विधानसभा मित्रपक्षाला देऊन त्या स्वतः संबंधित उमेदवाराला निवडूनही आणतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here