हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा सुरू

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :
गेल्या तीन महिन्यांपासून बंद असणारी कोल्हापूरची विमानसेवा रविवारी ‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ या मार्गाच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाली. पहिल्या दिवशी एकूण १४१ जणांनी प्रवास केला. लोकप्रतिनिधी आणि कोल्हापूरकरांच्या उपस्थितीमध्ये प्रवाशांचे उत्साही वातावरणामध्ये स्वागत करण्यात आले.

केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या दुस-या टप्प्याअंतर्गत अलायन्स एअर या कंपनीने रविवारपासून ‘हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर’ विमानसेवा सुरू केली. हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर आणि पुन्हा बंगलोर-कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर एकूण १४१ जणांनी या सेवेच्या पहिल्या दिवशी प्रवास केला. दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर ७० आसनी विमान दाखल झाले. याठिकाणी विमानतळ व्यवस्थापनाने या विमानाचे ‘वॉटर सॅल्युट’ने स्वागत केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक यांनी हैदराबादहून कोल्हापूरला आलेल्या प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन आणि कोल्हापूरहून बंगलोर जाणा-या प्रवाशांना बोर्डिंगपास देऊन स्वागत केले. वैमानिकांना कोल्हापुरी फेटा बांधून, हवाई सुंदरी यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापुरातून बंगलोर उड्डाण करणा-या विमानाचे फ्लॅग आॅफ केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकारी पूजा मूल, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष ललित गांधी, अलायन्स एअरचे चीफ कमर्शिअल मॅनेजर मनू आनंद, कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here