कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेला जल्लोषी वातावरणात प्रारंभ

0

 

कोल्हापूर : ढोल-ताशा, लेझीम पथक वाद्यांसह कोल्हापुरी पद्धतीचा मराठमोळा बाज अशा वातावरणात रविवारी कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर इंडिगो कंपनीद्वारे विमानसेवा सुरू केली. कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील ‘फर्स्ट फ्लाईट’ला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ती ‘फुल्ल’ होती. विमानाचे उड्डाण झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.
कोल्हापूरहून तिरूपती देवदर्शनला जाणाºया भाविकांची संख्या मोठी आहे. त्याचा विचार करून ‘इंडिगो’द्वारे ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावर अलायन्स एअर कंपनीने दि. ९ डिसेंबरपासून सेवा सुरू केली. ही सेवा नियमितपणे सुरू आहे. त्यापाठोपाठ आता रविवारपासून ‘इंडिगो’कडून हैदराबाद-कोल्हापूर आणि कोल्हापूर-तिरूपती मार्गांवर रोज विमानसेवा सुरू केली आहे. विमानतळाबाहेर प्रवाशांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या निनादात करण्यात आले. कंपनीचे कर्मचारी डोक्यावर कोल्हापुरी फेटा परिधान करून, तर महिला कर्मचारी डोक्यावर फेटा व नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या गणवेशात प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज होते. सकाळी ९ वाजता हैदराबादहून सुमारे ६५ प्रवासी घेऊन ‘इंडिगो’ कंपनीचे विमान कोल्हापूर विमानतळावर आले. विमानतळावर भारतीय तिरंगा आणि इंडिगो कंपनीचा निळा झेंडा दाखवत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेला ग्रीन सिग्नल दिला. सकाळी ९.४५ वाजता ६५ प्रवासी घेऊन त्या विमानाने तिरुपतीच्या दिशेने उड्डाण केले.

तिकीट दर
इंडिगो’ कंपनीने कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवेसाठी १९९९ रुपये तिकीट बुकिंग दर आकारला आहे, तर कोल्हापूर ते तिरूपती सेवेसाठी २४९९ ते ३०७७ रुपये तिकीट दर आकारणी केला आहे तर तिरूपती-कोल्हापूरसाठीही हाच दर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here