कोल्हापूरला रिंगरोड ठरेल विकासाचा महामार्ग

0

कोल्हापूर जिल्हा आज पर्यटन जिल्हा म्हणून नावारुपाला येत आहे. जिल्ह्याच्या एकूणच विकासासाठी आणि कोल्हापूर शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी प्रस्तावित रिंगरोड जिल्ह्याच्या विकासातील एक महत्वाचा पैलू ठरेल. म्हणूनच राज्य शासनाने कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या मुख्य उद्देशाने कोल्हापूर शहराभोवतालच्या जवळपास 23 गावांमधील 28 रस्त्यांचा समावेश असलेल्या 88 कि.मी. लांबीच्या बाह्यवळण मार्ग अर्थात रिंगरोडला मान्यता दिली आहे. सव्वाचारशे कोटी खर्चाच्या या प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पासाठी यंदा 40 कोटींची तरतूद करुन रिंगरोडचा मार्ग सुकर केला आहे.

कोल्हापूरच्या जनतेला भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या निकालात काढण्यासाठी वाहतूक कोंडीमुक्त कोल्हापूर या संकल्पनेवर भर देऊन रिंगरोडच्या ऐतिहासिक पर्वासाठी जिल्ह्याचे सुपूत्र आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लाभलेले पाठबळ नजरेआड करता येणार नाही. शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाच्या सुविधेस अनन्यसाधारण महत्व आहे. रस्ते ह्या विकासाच्या धमन्या म्हटल्या जातात ते खरचं आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरातील रस्ते किती प्रशस्त, नेटके, चांगले, स्वच्छ आणि दर्जेदार आहेत, यावरच अवलंबून असतो. आज कोल्हापुरातील सर्वच्या सर्व म्हणजे 9 प्रमुख एन्ट्री पॉईंटचे रस्ते कसे प्रशस्त आणि देखणे आहेत, त्यामुळे कोल्हापूरच्या सौंदर्याला आणि विकासाला मोलाची मदत होत आहे.

दिवसेंदिवस शहरांतर्गत वाहतुकही वाढली असून शहरात बहुतांश सर्वच ठिकाणी वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे अनेक प्रसंग पाहायला मिळत आहेत. शहरात असणारी वाहने तसेच व्यापार-व्यवसायाबरोबरच तीर्थक्षेत्र आणि पर्यटनासह अनेक कारणांनी शहरात येणाऱ्या तसेच शहरातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांची संख्याही बरीच वाढली आहे. दसरा, दिवाळीच काय ? आता 12 महिने 24 तास कोल्हापूर पर्यटकांनी गजबजले आहे. त्यामुळे शहरांच्या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला असून बऱ्याचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराबाहेरुन काढण्यात येत असलेला रिंगरोड सर्वार्थाने कोल्हापूरच्या पर्यटन तसेच एकूणच विकासाला सहाय्यभूत ठरणारा आहे.

गेल्या तीन वर्षात कोल्हापूरच्या रस्ते विकासाला खऱ्या अर्थाने दिशा आणि गती लाभल्याचे स्पष्ट दिसत आहे. गेल्या तीन वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात रस्ते सुधारणा, रुंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना विशेष मदत झाली. राज्य महामार्ग, जिल्हा व इतर मार्गावर जिल्ह्यात 634 कोटींचा निधी विविध योजनांमधून खर्च करण्यात आला असून त्याद्वारे 714 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात 39 पुलांची कामे हाती घेण्यात आली, त्यापैकी 15 कामे पूर्ण झाली असून 24 कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंचगंगा नदीवर राजाराम बंधारा- मोठा पुल बांधणे (18 कोटी) आदमापूर गावाजवळ उड्डाणपूल (18 कोटी), रुकडी गावाजवळ पंचगंगा नदीवर मोठा पूल (12 कोटी) अशा 8 पुलांचा समावेश आहे. याबरोबरच कोल्हापूर शहर टोलमुक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिलासा दिला आहे, ही सर्वांर्थाने महत्वाची बाब मानावी लागेल.

दिवसेंदिवस कोल्हापूर शहर विस्तारत असून शहरात वाहतुकीचा ताणही तितकाच वाढतो आहे. वाहतुकीवरचा वाढलेला प्रचंड ताण कमी करुन वाहतूक कोंडीमुक्त कोल्हापूर बनविण्यासाठी शहराबाहेरुन 88.529 कि.मी. लांबीचा रिंगरोड मंजूर करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकरांना अनोखी भेटच दिली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी या रिंगरोडसाठी यावर्षी 40 कोटीची तरतूद करुन या कामाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढच रोवली आहे.

कोल्हापूर शहरासभोवतालच्या जवळपास 23 गावांतून जाणाऱ्या ह्या रिंगरोडमध्ये 28 रस्त्यांचा अंतर्भाव करुन 88.529 कि. मी. निव्वळ लांबी 69.283 कि. मी. असा राज्यमार्ग क्र. 194 अ म्हणून रस्ते विकास योजना 2001-2021 मध्ये समावेश करण्यात आला आहे. या नियोजित रिंगरोडमुळे पुणे, मुंबई, बेळगांव, सांगलीकडून येणारी व रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, राधानगरीकडे मार्गस्थ होणारी वाहतूक व रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, राधानगरीकडून येणारी व पुणे, मुंबई, बेळगांव, सांगलीकडे मार्गस्थ होणारी वाहतूक ही प्रामुख्याने कोल्हापूर शहरातून होत आहे. नियोजित रिंगरोडमुळे शहरातून होणारी ही वाहतूक शहराबाहेरुन होणार असल्याने कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होऊन शहर वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदुषणमुक्त होण्याबरोबरच वाहनांच्या इंधन बचतीसही मोलाची मदत होणार आहे.

कोल्हापूर शहरास बाह्यवळण मार्ग अर्थात रिंगरोड तयार करण्यासाठीच्या राज्यमार्ग 194 अ साठी कोल्हापूर शहराभोवतीच्या 23 गावातील 28 रस्त्यांचा अंतर्भाव आहे. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पंपापासून कणेरी, गिरगांव, नंदवाळ, वाशी, महे, कोगे, कुडीत्रे फॅक्टरी, वाकरे फाटा, खुपीरे, यवलूज,वरणगे, केर्ली, निगवे, टोप, नागांव, मौजे वडगांव, हेर्ले, रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जाजल पेट्रोल पंपाजवळ मिळणाऱ्या रस्त्यापर्यंत एकूण 28 रस्त्यांचा अंतर्भाव असलेल्या या रिंगरोडच्या निर्माणाने कोल्हापूर शहर वाहतूक कोंडीमुक्त होऊन सर्वांगिण विकासाला निश्चितपणे दिशा आणि गती मिळेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here