राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीने कोल्हापूरची जागा धोक्यात?

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा सुरु होती. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक हे भाषणाला उभे राहिले असताना, त्यांच्या भाषणाला विरोध करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील कार्यकर्त्यांनी खासदार महाडिकांच्या भाषणाला विरोध केला. त्यामुळे भाषण सोडून खा. महाडिक यांना बाजूला बसण्याची वेळ आली. मग आमदार मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना दम दिला. आपण खा. मुन्ना महाडिकांनाच शंभर टक्के मते देऊन पुन्हा निवडून आणायचं आहे, असे आ. मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना बजावलं. त्यानंतर आ. मुश्रीफांनी खा. धनंजय उर्फ मुन्ना महाडिकांना भाषण देण्याची विनंती केली. मात्र खा. महाडिक पुन्हा भाषण करण्यास राजी होत नव्हते. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या नेत्याने खा. महाडिकांच्या हाताला धरुन ओढून भाषणासाठी आणलं.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडल्याने कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. खा. धनंजय महाडिक यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा आरोप नेहमीच आ. हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक हे भाजप नेत्यांसोबत दिसले होते. त्यामुळे आ. मुश्रीफ आणि खा. महाडिक यांच्यात वाद आहे. त्यातच लोकसभा निवडणूक तिकीटावरही आ. हसन मुश्रीफ यांनी दावा करत, विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना विरोध केला होता. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवारांनी आ. मुश्रीफांची समजूत काढून विद्यमान धनंजय महाडिक यांनाच तिकीट देण्याचं निश्चित केले आहे. खा. महाडिकांनी एकीकडे राष्ट्रवादीविरोधी कामे केल्यामुळे कोल्हापुरातील स्थानिक राष्ट्रवादीचे नेते नाराज आहेत. त्यातच मित्रपक्ष काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याशीही खा. धनंजय महाडिकांचं हाडवैर आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपली जागा कशी राखते हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here