कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी देसाई

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक दौलत देसाई यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील १३ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची मंत्रालयात उपसचिव पदावर बदली करण्यात आली आहे.

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील देसाई यांना प्रशाकीय सेवेचा मोठा अनुभव आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक म्हणून डिसेंबर २०१७ पासून कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन, मुंबई उपनगर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून तसेच ‘मेडा’ येथे अतिरिक्त महासंचालक म्हणून काम केले आहे. १९८८ साली विक्रीकर अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या देसाई यांनी फलटण, वाई, पुणे येथे प्रांताधिकारी म्हणून १९९३ ते २००६ या कालावधीत काम केले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एमएस्सी केलेल्या देसाई यांनी एलएलबीचे शिक्षणही घेतले आहे. नेदरलँड येथील पब्लिक पॉलिसी आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज येथून त्यांनी एमए केले आहे. मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठात ते सध्या पीएचडी करत आहेत. मुंबईत नुकतीच झालेली जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. विदेशातील विविध विद्यापीठांच्या फेलोशिपही त्यांना मिळाल्या आहेत. मंगळवारपर्यंत पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

पंचगंगेवरील पर्यायी पुलाच्या बांधकामाला आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत परवानगी देण्याबाबत देसाई यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. देसाई यांचे मूळ कुटुंब गडहिंग्लज तालुक्यातील आहे.

दरम्यान, मंत्रालयात बदली झालेल्या अविनाश सुभेदार यांनी कोल्हापुरातील कारकीर्दीबाबत समाधान असल्याचे सांगितले. पर्यायी पूल, विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात सुभेदार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here