कोल्हापूर जिल्ह्यात थंडी कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी आलेली थंडीची लाट रविवारीही कायम राहिली. तापमानात तब्बल 4 अंशांची घट झाली आहे. पारा 13 अंशांपर्यंत अचानक खाली आल्याने संपूर्ण जिल्हा गारठला. सकाळी काही भागांत दाट धुकेही पडले. थंडीची तीव्रता आणखी काही दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी होत चालला होता. गेल्या चार दिवसांपासून पारा 17 ते 18 अंशांपर्यंत होता. थंडी कमी होऊन उन्हाची तीव्रता वाढेल, अशी शक्यता असतानाच शुक्रवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढत गेला.

शनिवारी पहाटेपासून थंडीची तीव्रता कमालीची जाणवत होती. बोचर्‍या वार्‍याने हुडहुडी भरत होती. अचानक वाढलेल्या थंडीने जनजीवनावर परिणाम झाला. अनेकांनी पहाटे घराबाहेर पडण्याचेही टाळले. सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत थंडीचा कडाका जाणवत होता. यामुळे ऊबदार कपडे घालूनच अनेकांनी घराबाहेर पडणे पसंद केले. थंडी कमी झाल्याने काही दिवसांपासून बाजूला ठेवलेले स्वेटर, कानटोप्या, हातमोजे आदी ऊबदार कपडे शनिवारी पुन्हा बाहेर काढावे लागले. काही दिवसांपासून ओस पडलेल्या ऊबदार कपडे विक्रीच्या दुकानांतही शनिवारी सकाळपासून पुन्हा गर्दी दिसत होती.

थंडी वाढल्याने शहरासह ग्रामीण भागांत शेकोट्या पेटल्याचे चित्र शनिवारी व रविवारी दिसत होते. अशीच अवस्था जिल्ह्याच्या अन्य भागांतही होती. दिवसभर बोचर्‍या वार्‍यामुळे हवेत गारठा कायम होता. यामुळे दिवसभर ऊन पडूनही थंडीची तीव्रता जाणवत होती. यामुळे नागरिकांना अजून काही दिवस थंडीचा सामना करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here