कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी धाडसी चोरी

0

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

कोल्हापूर शहरात जवळपासच्या दोन सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री धाडसी चोरी केली. ही घटना गुरूवारी उघडकीस आली असून अंदाजे २२ लाखांचा ऐवज लंपास केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी जरी ही चोरी झाली असली तरी ती एकाच टोळीने केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी, कोल्हापूरातील महाद्वार रोडवरील लक्ष्मी मुकूंद अपार्टमेंट येथील प्रमोद कल्लाप्पा कोलेकर (देसाई) यांच्या मालकीच्या सराफ दुकानात पहाटे सव्वा चारच्या सुमारास तीन चोरट्यांनी प्रवेश करुन ही चोरी केली. हे तिघेजण एका व्हॅनमधून आल्याचे रोडवरील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरुन उघड झाले आहे. या चोरट्यांनी हत्याराने दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने ठेवलेली दोन बाय अडीचच्या आकाराची तिजोरीच उचलून नेली. या तिजोरीला सायरन लावलेले होते, तरीही चोरट्यांनी चोरी केली.

या तिजोरीत ग्राहकांसाठी तयार केलेले बारशाचे व इतर सोन्याचे तसेच चांदीचे दागिने होते. चोरट्यांनी सराफी दुकानाच्या काउंटरवरील सोने आणि चांदीचे दागिनेही लंपास केले. प्रमोद देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांनी ६०० ग्रॅम सोने, अंदाजे १५ ते २० किलो चांदी, तिजोरी असा एकु १८ लाखांची चोरी केली. या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक तैनात नव्हता, ही बाबही उघड झाली आहे.

दरम्यान, गुजरीजवळील रंकाळा रोडवरील गुरुवार पेठेतील पुष्कराज मित्र मंडळाजवळील संतोष दिनकरराव शेळके (रा. फुलेवाडी, तिसरा स्टॉप) यांच्या मालकीच्या सराफी दुकानातूनही अज्ञात चोरट्यांनी सुमारे रोख रक्कमेसह पाच लाखांचा सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला आहे.

पहाटे डोक्याला टोपी, कानाला बांधलेले, चेहरा झाकलेल्या अज्ञात चोरट्यांना दुकानातीलच सीसीटीव्ही फुटेजमध्ये टिपण्यात आले आहे. यातील एकाने दुकानात प्रवेश करुन स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने दुकानातील लॉकर फोडून त्यातील साहित्य लंपास केले. सराफ व्यावसायिक संतोष शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ४ किलो चांदी आणि १०० ग्रॅम सोन्याची या चोरट्यांनी चोरी केली आहे. रोख ६६ हजाराची रक्कमही चोरट्यांनी पळवली असून अंदाजे पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

या दोन्ही चोरीप्रकरणातील चोरटे एकच असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. या धाडसी चोरीमुळे शहरात आणि सराफ व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. शाहुपुरी, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here