अर्जुन खोतकरांची तलवार म्यान

0

मुंबई (प्रतिनिधी) :

शिवसेनेचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तलवार म्यान केली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जालना मतदार संघातून रावसाहेब दानवे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाकडून करण्यात येणार आहे.

औरंगाबाद येथे भाजपा आणि शिवसेना नेत्यांमधील सुरू असणारी बैठक तब्बल दोन तासांनतर संपली आहे. या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद मिटल्याचे वृत्त आहे. अर्जुन खोतकर यांनी जालानामधून माघार घेतल्यामुळे रावसाहेब दानवे यांची उमेदवारी पक्की झाली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह शिवसेना पक्षअध्यक्ष उद्धव ठाकरे, संजय राऊत, रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर उपस्थित होते.

शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक पातळीवरील वाद आणि नेत्यांमधील तेढ कमी करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही औरंगाबाद आणि जालना या दोन्ही ठिकाणी उमेदवार ठरविता आलेले नाही. जागांचा तिढा न सुटल्याने प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद कमी करण्यास कोणते उपाय सुचवले जातात, याची उत्सुकता आहे. विशेषत: जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आणि काँग्रेसची युती आहे.

दरम्यान, मराठवाडय़ातील शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या नावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. यात उस्मानाबादचाही समावेश आहे. अद्यापि उस्मानाबादच्या जागेचा तिढा शिवसेनेला सोडवता आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here