बैलगाडीचे चाक डोक्यावरून गेल्याने जरळीच्या शेतकऱ्याचा मृत्यू

0

गडहिंग्लज : ऊसाने भरलेल्या बैलगाडीवर चढताना पाय घसरून पडल्याने मारुती पांडुरंग धनगर ( वय ३४ रा. जराळी ) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे हि दुर्घटना घडली. धनगर कुटूंबातील करता पुरुष गेल्याने उदरनिर्वाहाचा आधार हरपला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मारुती धनगर हे गेली सात वर्ष गडहिंग्लज कारखान्याकडे ऊस वाहतुकीचा व्यवसाय करत होते. मल्लाप्पा चौगुले यांच्या घरासमोर घाटगे मळा येथे गुरुवारी रात्री बैलगाडीत ऊस भरून ठेवला होता. शुक्रवारी पहाटे गडहिंग्लज कारखान्याला उसगाडी घेऊन जाण्यासाठी धनगर निघाले. यावेळी चाकावरून चढताना तोल गेल्याने पाय घसरून रस्त्यावरच ते खाली पडले. भरलेल्या ऊस गाडीचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावरील दृश्य ह्रदयद्रावक होते. याठिकाणी बघणाऱ्यांनी गर्दी केली होती. घाटनास्थळी येऊन पोलिसांनी पंचनामा केला. मारुती धनगर यांच्या पत्नीचा दीड वर्षांपूर्वी मुर्त्यू झाला होता. त्यानंतर वृद्ध आई-वडील आणि तीन मुली आणि मुलगा यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोजकी शेती असल्याने मोलमजुरी करून ते कुटूंबाची गुजराण करत होते. अचानक घडलेल्या या घटनेने धनगर कुटुंब उघड्यावर पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बसवराज आपय्या धनगर यांनी गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दिली असून तपस हवालदार कुंभार हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here