जनता दलाची विधानसभेसाठीची भुमिका बुधवारी होणार स्पष्ट

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

कोल्हापूर जिल्ह्यात आलेली मरगळ झटकत येणार्‍या विधानसभा निवडणुकामध्ये कात टाकण्याच्या दृष्टीने जनता दल (सेक्युलर) सज्ज झाले आहे. त्यामुळेच जनता दल (सेक्युलर) तर्फे आगामी विधानसभा पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा गडहिंग्लज येथील चर्च रोड वरील विनायक प्लाझा येथे बुधवारी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच याच दिवशी विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती पक्षाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत तीन तालुक्यातील पक्षकार्यकर्त्यांची भूमिका समजून घेतली जाणार आहे. या मेळाव्यात निवडणूक लढवण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या मेळाव्यानंतर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाच्यावतीने करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये ६ वर्षावरील शेतकऱ्यांना महिन्याला २००० ते ५००० पेन्शन मिळाली पाहिजे, गडहिंग्लज – आजरा – चंदगड येथील कारखान्यांनी सन २०१८ – १९ या गळीत हंगामामध्ये घोषित केलेला अंतिम दर दिला नसून तो लवकरात लवकर द्यावा, एफआरपीप्रमाणे गाळपाला आलेल्या उसाचा दर तुकडे न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रकमी तातडीने जमा करावी. शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी व्हावी. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, गडहिंग्लज तालुक्यातील नूल, हलकर्णी, दुंडगे या सर्कलमधील दुष्काळग्रस्त गावे म्हणून शासनाने जाहीर केले आहे. तेथील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, गडहिंग्लज तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, गडहिंग्लज तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव करंबळी, चन्नेकुप्पी, कुमरी, मनवाड, नंदनवाड, शेंद्री, नारेवाडी, तरेणी, येनेचवंडी, वैरागवाडी येथील छोटे – मोठे तलाव शासनाने स्व:खर्चाने हिरण्यकेशी नदीतील पाणी उपसा करून कायम स्वरूपी पाणी भरण्याचे नियोजन करावे. विकासातील आराखड्यातील पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, डिझेल, पेट्रोल दरवाढ कमी करावी, शेतीमालाला हमीभाव मिळाले पाहिजेत व स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, देवदासी, विधवा व गरीब बेघरन जमीन व घरे द्यावीत, हा मागण्यांचा समावेश आहे.

सदर मेळाव्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे, प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, जनता दल महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव प्रताप होगाडे, महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी सलीम भाटी, विनायक व्हनबट्टे, अॅड. अरुण सोनाळकर, वसंतराव पाटील, विठ्ठलराव खोराटे, शिवाजीराव परुळेकर, अमृत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

गडहिंग्लज तालुका जनता दलाचे अध्यक्ष बाळेश नाईक, आजरा तालुका अध्यक्ष सदानंद व्हनबट्टे, चंदगड तालुका अध्यक्ष अॅड. व्ही.आर. पाटील, गडहिंग्लज शहर अध्यक्ष काशिनाथ देवगोंडे, युवा अध्यक्ष मालतेश पाटील, सचिव बाबुराव धबाले, कार्याध्यक्ष उदय कदम, उपनगराध्यक्ष सुनीता पाटील, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, गोडसाखरचे संचालक बाळासाहेब मोरे, गोडसाखरचे संचालक बाळकृष्ण परीट, गोडसाखरचे माजी संचालक श्रीपती कदम, गोडसाखरचे माजी संचालक भीमराव पाटील, गोडसाखरचे माजी संचालक सुभाष देसाई व गोडसाखरचे माजी संचालक बाळासाहेब मोकाशी यांनी मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here