अभ्यासपूर्ण वाचन व लेखनामुळे घडलो- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

0
अभ्यासपूर्ण वाचन व लेखनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरात पोहोचवू शकलो, अशा भावना महाराष्ट्र भूषण व ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार व अनौपचारीक गप्पांचा कार्यक्रम आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन बाबासाहेबांचे स्वागत केले तर ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

बाबासाहेबांनी यावेळी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची उंची विश्वव्यापी आहे. योद्धा, मुत्सद्दी नेता, कुटनीती तज्ज्ञ, पूत्र, पती, वडील असे विविध पैलू महाराजांच्या व्यक्तीमत्वाला आहेत. महाराजांच्या व्यक्तीमत्वाची भुरळ विदेशी लेखक व नेत्यांनाही पडली. नेत्से, विस्टन चर्चिल, लेनीन या जागतिक नेत्यांप्रमाणे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. तत्कालीन ब्रिटीश शासक जेम्स डग्लस यांनी ठाणे-मुंबई या रेल्वे प्रवासात डोंगरावर पाहिलेला भला मोठा किल्ला आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाविषयी त्यांनी केलेला अभ्यास याविषयी बाबासाहेबांनी यावेळी सविस्तरपणे सांगितले. जेम्स डग्लस यांनी लिहीलेले ‘बुक ऑफ बॉम्बे’ व त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वर्णन आदींबाबतही त्यांनी माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुआयामी व्यक्तीमत्व घराघरांमध्ये पोहोचविण्यासाठी अल्प प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. हे केवळ अव्याहत लेखन, वाचन आणि अभ्यासामुळेच शक्य झाले. या सर्वांमुळेच आपण घडलो असल्याच्या नम्र भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

मला घडविण्यात वडिलांचा मोठा वाटा
माझी आवड आणि क्षमता ओळखून माझ्या वडिलांनी मला कामात प्रोत्साहन दिले म्हणूनच मी आज काही करू शकलो, असे भावोद्गार बाबासाहेबांनी काढले. माझ्यातील कला फुलवण्यात वडिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. कधी बोट धरून तर प्रसंगी कान धरून त्यांनी मला घडविले. माझे वडील हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते, अशा शब्दात बाबासाहेबांनी वडिलांबद्दल कृतज्ञ भाव व्यक्त केला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या आठवणींना उजाळा
दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची नुकतीच सुरूवात झाली होती, तेव्हाच मी या कार्यालयाला भेट दिली अशा शब्दात बाबासाहेबांनी परिचय केंद्राबद्दल आठवण सांगितली. परिचय केंद्राचे तत्कालीन मुख्य माहिती अधिकारी भा.कृ.केळकर यांच्या निमंत्रणावरून या कार्यालयात ७० च्या दशकात भेट दिली. आज या कार्यालयाचा विस्तार झाला असल्याचे पाहून आनंद होत आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आपणा सर्वांना महाराष्ट्राची सेवा करण्याची उत्तम संधी लाभली असल्याचे ते म्हणाले.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी यावेळी प्रात्साविक केले तर उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिचय केंद्राच्या अधिकारी–कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अधोरेखीत करणारा पोवाडा सादर करून बाबासाहेंबाना मानवंदना दिली. यावेळी परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, पत्रकार आणि कार्यालयाला भेट देणारे अभ्यागत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here