कृषि विस्तारासाठी प्रशिक्षण देणारी संस्था ‘रामेती’

0

राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांद्वारे शासन लाभ पोहोचवित असते. त्यासाठी राज्याचा कृषि विभाग कार्यरत असतो. हा विभाग आपल्या विविध कर्मचाऱ्यांमार्फत थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत असतो. अशा या विभागातील कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी शासनाची प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) ही खोपोली येथे असून या संस्थेमार्फत कोकण विभागातील कृषि कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. यासंस्थेची थोडक्यात माहिती

प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) खोपोली, जि. रायगड ही संस्था वनामती नागपूर यांचे अधिनस्त कार्यरत आहे. या संस्थेमार्फत कोकण विभागातील कृषि विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते.

राज्य प्रशिक्षण धोरण 2011 अंतर्गत यासंस्थेमार्फत कोकण विभागातील सर्व शासकीय विभागातील वर्ग-3 कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रशिक्षण देण्यात येते.

या विभागीय व जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी यशदा, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात येते.

प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) खोपोली संस्थेची निर्मिती व इतिहास :

सन 1964 पूर्वी ही संस्था कृषि खात्याचा भाग म्हणून भात संशोधन केंद्र म्हणून विकसित करण्यात आली. त्यानंतर सन 1964 ते 71 या कालावधीत येथे इंडो- जापनिज पॅडी एक्स्टेंशन प्रकल्प याच ठिकाणी राबविण्यात आला. पुढे सन 1971 ते 82 या कालावधीत कृषि विद्यावेत्ता जपानी भात प्रात्यक्षिक केंद्र या ठिकाणी होते. सन 1982 – 82 मध्ये जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटीक म्हणून हे केंद्र विकसित झाले. तद्नंतर सन 1983 ते 98 मध्ये मृदसंधारण प्रशिक्षण संस्था म्हणून या केंद्राचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर सन 1998 ते 2001 या ठिकाणी विभागीय कृषि विस्तार प्रशिक्षण संस्था अस्तित्वात आली आणि त्यानंतर 17 जुलै 2001 पासून वनामती स्वायत्त विस्तार प्रशिक्षण संस्था अंतर्गत या संस्थेचा समावेश होऊन सन 2002 मध्ये प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (रामेती) म्हणून कोकण विभागातील कृषि विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे कार्य या संस्थेमार्फत चालते. नागपुर येथील वनामती या संस्थेची अधिनस्थ संलग्न संस्था म्हणून ही संस्था कार्य करीत आहे.

या संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण कोकण विभागासाठी असून त्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. एकूण क्षेत्र 16.96 हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या संस्थेत उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि चिकित्सालय, फळरोपवाटीका ही कृषि विभागाची कार्यालयेही कार्यान्वित आहेत.

रामेती संस्थेचे उद्देश :

१) कृषि विभागातील अधिकारी / कर्मचारी व कृषि व संलग्न विभाग (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, सामाजिक वनीकरण व मत्स्यसंवर्धन) यांचे करीता सेवाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे.
2) कोकण विभागातील कृषि प्रशिक्षण विषयक गरजा राबविणे.
3) अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी यांचा क्षमता बांधणी करणे व मनुष्यबळ विकास करणे.
4) कृषि विभागातील मानव साधन संपत्तीचा आधुनिक तंत्रज्ञान प्रसारणासाठी प्रभावीपणे वापर होण्याच्या दृष्टिने संस्थेमधून मनुष्यबळ विकास करणे.
5) प्रभावी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण साहित्य निर्मिती करणे.
6) कृषि विभागातील अधिकाऱ्यांचे तंत्रज्ञान व्यवस्थापनातील कौशल्य विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण देणे.
7) आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांसह इतर मानव साधन संपत्तीची क्षमता विकसीत करणे.
8) जिल्हा प्रशिक्षण केंद्र आणि कृषि विद्यापीठ स्तरावर प्रशिक्षण आयोजित करणे.

प्रशिक्षण संस्थेतील सोयी सुविधा :

संस्थेची सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत असून चार प्रशिक्षण हॉल आहेत त्यातील तीन हे वातानुकुलीत आहेत. शिवाय एकूण 75 जणांची निवास क्षमता असणारे वसतिगृह आहे. याशिवाय प्रशिक्षणार्थींसाठी भोजन गृह, अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थान, प्राचार्य निवासस्थान आदी इमारतीही प्रशिक्षण संकुलाच्या आवारात आहेत.

विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (रामेती) खोपोली (2013)

ही प्रशिक्षण संस्था विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या नियंत्रणाखाली काम करते.

संस्थेची उद्दिष्ट्ये :

1. विभागीय मुख्यालयात असलेल्या वर्ग-ब व क च्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रम घेणे.
2. विशेष योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी निवडलेल्या गटांकरिता विशेष कार्यशाळा आयोजित करणे.
3. विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे अंगीकृत व्यवसाय यांच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय संस्थांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे.
4. प्रशिक्षणाचे वेळोवेळी मूल्यमापन करणे.
5. प्रशिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात आवश्यक कार्यवाही करणे.

नियामक मंडळ : संस्थांचे प्रशिक्षण विषयक कामकाजा संदर्भात व संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी.

कार्यकारी मंडळ : दैनंदिन कामकाजावरील नियंत्रणासाठी. (शासन निर्णय दि. 14 ऑक्टोबर 2013)

1. संस्थांचे प्रशिक्षण विषयक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन करणे.
2. संस्थेच्या प्रशासनिक व वित्तिय बाबी, प्रशिक्षणाची व्यवस्था याबाबत निर्णय घेणे.
3. संस्थांचे प्रशिक्षण विषयक कामकाजाचा आढावा घेणे.
4. कार्यकारी समितीची बैठक आवश्यकतेनुसार तथापि वर्षातून किमान 2 वेळा आयोजित करणे.
5. कार्यकारी मंडळाचे एकूण सदस्य 9 असून कार्यकारी मंडळाचा कोरम 4 सदस्यांचा असेल.

जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, रामेती, खोपोली

संस्थेची उद्दिष्टे :

1. जिल्ह्यात असलेल्या वर्ग-ड कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
2. जिल्ह्यातील विशेष योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी निवडलेल्या गटांकरिता विशेष कार्यशाळा आयोजित करणे.
3. संबंधित जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाचे अंगीकृत व्यवसाय यांच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय संस्थांना प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे.
4. प्रशिक्षणाचे वेळोवेळी मूल्यमापन करणे.
5. प्रशिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात आवश्यक कार्यवाही करणे.
6. संस्थांचे प्रशिक्षण विषयक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन करणे.
7. संस्थेच्या धोरणविषयक बाबींवर निर्णय घेणे.
8. कार्यकारी समितीची बैठक आवश्यकतेनुसार तथापि वर्षातून किमान 2 वेळा आयोजित करावी. बैठकीमध्ये संस्थेच्या प्रशासनिक व वित्तीय बाबी, प्रशिक्षणाची व्यवस्था याबाबत निर्णय घेणे.

संस्थेची कामगिरी :

संस्थेने गेल्या वर्षभरात नोव्हेंबर महिन्याअखेर कृषि विस्तार प्रशिक्षण कार्यक्रमात 27 सत्रांमधून 736 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. यात 70 शेतकऱ्यांच्या एका सत्राचा समावेश आहे. तर पायाभुत प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रमाची एकूण 13 सत्र झाली त्यातून 636 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा प्रशासकीय पायाभूत उजळणी प्रशासकीय कार्यक्रमात 22 सत्रांमधून 1402 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

संस्थेशी संपर्क : 02192 -263324 फॅक्स :263312
ई-मेल : rametikhopoli@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here