उसावरील हुमणी किडीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन

0

सद्यस्थितीत अनेक भागात उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिकुल हवामान, कमी पाऊसमान यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येतो. हुमणी ही किड उसाची पांढरी मुळे खात असल्याने ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. हुमणी ही बहुभक्षी किड असून साधारणपणे भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये आढळून येते.
हुमणी किडीच्या प्रामुख्याने होलोस्ट्रॅकिया सिराटा व ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या दोन महत्त्वाच्या प्रजाती महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. यापैकी होलोस्ट्रॅकिया सिराटा या जातीच्या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने महाराष्ट्राच्या नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यात दिसून येतो आणि ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात दिसून येतो.

हुमणी किडीच्या नुकसानीचा प्रकार

हुमणीच्या प्रथम अवस्थेतील अळ्या सुरुवातीच्या काळात कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजिविका करतात व त्यानंतर उसाची तंतुमय मुळे खातात, तर प्रौढ भुंगा बाभूळ, कडुनिंब, बोर इत्यादी झाडावर उपजीविका करतात. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. या अळ्यांनी झाडांची मुळे कुरतडल्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे सहजरीत्या उपटली जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास ही झाडे कोलमडून पडतात. हुमणीमुळे उसाच्या उगवणीत 40 टक्के नुकसान होऊ शकते.

आर्थिक नुकसानीची पातळी

हुमणीची एक अळी प्रति चौरस मीटर क्षेत्रावर आढळल्यास तसेच झाडांवर सरासरी 20 किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजणे आवश्यक आहे.

हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन

1. पिक काढणी नंतर खोल नांगरट करुन घ्यावी. त्यामुळे उघड्या पडलेल्या अळ्या गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात.
2. शेतातील ढेकळे फोडून घ्यावीत, जेणेकरुन ढेकळांमध्ये असलेल्या हुमणीच्या विविध अवस्थेतील अळ्यांचा नाश होतो. यासाठी रोटाव्हेटर किंवा तव्याचा कुळव देखील वापरता येईल.
3.पावसाच्या पहिल्या सरीबरोबरच भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. संध्याकाळी भुंगेरे झाडांवर दिसून येतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. या काळातच बाभूळ, बोर व कडुनिंबाची झाडे हलविल्यास झाडाच्या पानांवरील भुंगरे जमिनीवर पडतात. हे पडलेले भुंगेरे गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकल्याने अर्ध्या तासात ते मरतात. त्यामुळे त्यांची एक पिढी नष्ट होते, त्यामुळे त्यांचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील नुकसान टळते.
4. सुर्यफुल पिकाबरोबर उसाची फेरपालट करावी जेणेकरुन हुमणीचा प्रादुर्भाव कमी होईल.
5. भुंगेरे गोळा करण्यासाठी एक हेक्टर क्षेत्रात एक प्रकाश सापळा वापरण्यास सुचवावे. या सापळ्यातील भुंगे गोळा करुन नष्ट करावेत.
6. पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचून राहील याकडे लक्ष द्यावे. जेणेकरुन साचलेल्या पाण्यामध्ये अळ्या गुदमरुन मरतील.
7. हुमणीग्रस्त शेतातील सुकलेली पिकांची रोपे उपटावीत व मुळाशेजारील अळ्यांचा रॉकेल मिश्रीत पाण्यात नाश करावा.

जैविक उपाय

1. हुमणी किड अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे, त्यामुळे शेतात पक्षी थांबे लावावेत.
2. हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचा नैसर्गिक शत्रूंचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. त्यामध्ये बगळा, चिमणी, कावळा, घार इ. पक्षी व मांजर, कुत्रा, रानडुक्कर, मुंगूस, उंदीर इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.
3. दोन किलो बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम ही परोपजीवी बुरशी अनिसोपली 20 किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून, पीक लागवडी अगोदर एक हेक्टर जमिनीत मिसळावी म्हणजे प्रथमावस्थेतील अळ्यांचा बुरशीमुळे नाश होईल.
4. जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सूत्रकृमी (हेटरो-हॅब्डेटीस) हे होलोट्रॅकिया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.
5. हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सुत्रकृमीचा वापर करावा यासाठी 50 मिली ई.पी. एन कल्चर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे किंवा 2.5 लिटर ई.पी. एन कल्चर प्रति हेक्टर या प्रमाणाने ठिबक/प्रवाही सिंचनातून देणे. तसेच पावडर स्वरुपात असल्यास 3 किलो प्रती हेक्टर याप्रमाणे वापरावे.

रासायनीक उपाय

1. जमीन तयार करताना अथवा शेणखतामधून फोरेट (10 टक्के दाणेदार) 25 किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात वापर करावा.
2. हुमणीच्या नियंत्रणासाठी पहारीच्या सहाय्याने बुंध्यालगत किंवा दोन बुंध्याच्या मध्ये छोटासा खड्डा घ्यावा. यासाठी ऊस पिकात खत घालण्याची जी पहार आहे तिचा वापर करावा. फवारणी पंपाचे नोझल काढून बुंध्यालगत 40 मिली क्लोरोपायरिफॉस 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची बुंध्यालगत तयार केलेल्या खड्ड्यात आळवणी करावी.
अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अथवा जिल्हा परिषद कृषि विभागाशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here