हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य : नरेंद्र मोदी

0

 

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. भारतीय जवानांवर हल्ला करुन हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे. याची किंमत हल्लेखोरांना चुकवावीच लागेल, असा इशारा नरेंद्र मोदींनी दिला आहे. वंदेभारत ट्रेनच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

भारतातील 130 कोटी जनता पुलवामा घटनेच्या हल्लेखोरांना सडेतोड उत्तर देईल. एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही, असं मोदी म्हणाले. आर्थिक समस्येपासून त्रस्त असलेल्या शेजारील राष्ट्राला वाटतं की, असे हल्ले करुन भारताला कमकुवत करु, मात्र त्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचं नाव घेता नरेंद्र मोदींनी असा इशारा दिला.

पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे जे जवान शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यामुळे देशातील जनतेमध्ये संतापाची लाट आहे. त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत, हे मी समजू शकतो. यावेळी काही करुन दाखवण्याच्या भावना आहेत, ते सहाजिक आहे. सैन्य दलांना पूर्ण स्वतंत्र्य दिलं आहे, भारतीय सैन्याच्या शौर्यावर मला पूर्ण विश्वास आहे, असंही मोदी म्हणाले.
या हल्ल्यावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. यावर बोलताना मोदी म्हणाले की, जे आमच्यावर टीका करत आहेत, मी त्यांच्या भावना समजू शकतो. त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र राजकारण करण्याची ही वेळ नाही. या हल्ल्याचा देश एकत्र येऊन सामना करत आहे, असं देखील मोदी म्हणाले.
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील श्रीनगर-जम्मू हायवेवर सीआरपीएफच्या ताफ्यावर काल जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने हल्ला केला. या हल्ल्यात 37 सीआरपीएफचे जवान शहीद झाले, तर काही जवान जखमी झाले आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावं, अशी मागणी अनेकांकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्लेखोरांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here