प्रजासत्ताक दिनी विराटसेनेची विजयी भेट

0

माऊंट मनगुई (वृत्तसंस्था) :

भारताच्या ३२५ धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने भारताच्या फिरकीपुढे गुडघे टेकले. भारताने न्यूझीलंडचा २३४ धावात ऑलआऊट केला आणि सामना ९० धावांनी जिंकला. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी मारा करत ४ फलंदाजांना माघारी धाडले. तर न्यूझीलंडच्या डग ब्रेसवेलने एकाकी झुंज देत ५७ धावा केल्या. पण, तो न्यूझीलंडचा सलग दुसरा पराभव टाळू शकला नाही. या विजयाबरोबच भारत ५ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या ३२५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाच्या २३ धावा झाल्या असताना आक्रमक शैलीचा सलामीवीर मार्टिन गुप्टीलचा भुवनेश्वरने अडसर दूर केला. त्यानंतर न्यूझीलंडने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर कर्णधार विल्यम्सनही बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडने जरी ६ च्या रनरेटने सुरुवात करत भारताच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली असली तरी त्यांनी आपल्या विकेटही गमावण्यास सुरुवात केली होती. विकेट पडण्याचा हा सिलसिला कायम राहिला. रॉस टेलर, टॉम लॅथम आणि हेन्री निकोलस यांनी भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला पण, कुलदीप यादवच्या फिरकीपुढे त्यांना जास्त काळ टिकाव धरता आला नाही.

किवींची ६ बाद १४६ धावा अशी खराब अवस्था झाली असताना डग ब्रुसवेलने एकाकी लढत देत किवींना २०० धावांच्या पार पोहचवले. पण, ब्रुसवेलची ही एकाकी लढत भुवनेश्वरने ४० व्या षटकात संपवली. ब्रुसवेलने ३ षटकात आणि ५ चौकारांच्या मदतीने ४६ चेंडूत ५७ धावांची आक्रमक खेळी केली. ब्रुसवेल बाद झाल्यावर भारताने किवींचे शेपूट गुंडाळण्यात जास्त वेळ लावला नाही. चहलने फर्गुसनला बाद करत न्यूझीलंडला २३४ धावात गुंडाळले.

भारताकडून फिरकी गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. कुलदीप यादवने पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात ४ बळी टिपले. तर चहल आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी मिळवले.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या धमाकेदार सलामीनंतर विराट, रायडू, धोनी आणि केदार जाधवने दिलेल्या योगदानाच्या जोरावर भारताने न्यूझीलंड समोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून रोहित शर्माने ८७, शिखर धवनने ६६, विराटने ४३, रायडूने ४७ धोनीने ४८ धावा केल्या.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने विराटचा हा निर्णय योग्य ठरवत आक्रमक सुरुवात केली. सुरवातीच्या काही षटकात आक्रमणाची धुरा शिखर धवनने आपल्या खांद्यावर वाहिली. दोघेही आपल्या अर्धशतकाजवळ पोहचल्यावर रोहितने आपला गिअर बदलला. त्याने तुफान फटकेबाजी करत भारताला नाबद शतकी सलामी दिली. दरम्यान, शिखरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, त्याला या अधर्शतकाचे रुपांतर मोठ्या धावसंख्येत करता आले नाही. तो ६६ धावा करुन माघारी परतला.

रोहितने एका बाजूने तुफान फटकेबाजी सुरुच ठेवली होती. त्यामुळे भारताने २५ व्या षटकातच दिडशतक पूर्ण केले. रोहित आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच लोकी फर्गुसनचा अखूड टप्यावरील चेंडू पूल मारण्याच्या नादात ग्रँडहोमेकडे झेल देत बाद झाला. त्याने ३ षटकार ९ चौकारांच्या मदतीने ९६ चेंडूत ८७ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर कर्णधार विराट कोहलीने भारताच्या डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली.

रोहित बाद झाल्यावर विराट कोहली आणि अंबाती रायडूने भारताची धावगती कमी होऊ दिली नाही. दोघांनीही भारताला ३५ च्या षटकातच २०० च्या पार पोहचवले. पण, विराट ४३ धावांवर बाद झाल्यावर भारताची धावगती मंदावली. काही षटके झाल्यावर अंबाती रायडूही बाद झाला. त्यालाही अर्धशतक पूर्ण करता आले नाही. त्याला ४७ धावांवर फर्गुसनने बाद केले. रायडू बाद झाला त्यावेळी भारताच्या ४५ षटकात २७१ धावा झाल्या होत्या.

अखेरच्या ५ षटकात महेंद्रसिह धोनी आणि केदार जाधवने तडाखेबाज फलंदाजी करत भारताला ३२४ धावांपर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या एकदिवसीय मालिकेत फॉर्ममध्ये परतलेल्या धोनीने याही सामन्यात १ षटकात आणि ५ चौकारांच्या मदतीने ४८ धावांची नाबाद खेळी केली. त्याला केदार जाधवने १० चेंडूत २२ धावांची छोटी पण, आक्रमक खेळी करुन चांगली साथ दिली. न्यूझीलंकडून फर्गुसन आणि बोल्ट यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here