India vs Australia 4th ODI: महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतच्या कामगिरीकडे नजर

0

 

मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील दोन सामन्यात युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत याला विश्वचषकाच्या दृष्टीने तयार करण्यासाठी अनुभवी महेंद्रसिंग धोनी याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे ऋषभची पहिली परीक्षा रविवारी चौथ्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने असेल. येथे तो कशी कामगिरी करतो, यावर विश्वचषकाची त्याची दावेदारी विसंबून असेल.

कर्णधार विराट कोहली विश्वचषक संघाच्या सर्वच संभाव्य खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. याच कारणास्तव संघ व्यवस्थापन ऋषभची परीक्षा घेणारआहे. धोनीला विश्रांती दिल्यामुळे ऋषभला फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही आघाड्यांवर सरस ठरावे लागेल. याशिवाय मोहम्मद शमीच्या जागी भुवनेश्वर कुमार याला संधी दिली जाईल. शमीला तिसऱ्या सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली होती.

फलंदाजीत विराटशिवाय कुणीही फलंदाज धावा काढण्यात यशस्वी ठरलेला नाही. कोहलीपाठोपाठ धावा काढण्यात केदार जाधवला थोडेफार यश आले. रोहित आणि रायुडू यांच्याकडून अपेक्षापूर्ती मात्र झालेली नाही. सलामीविर शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. कोहली संघात आमूलाग्र बदलाच्या विचारात नाही, पण लोकेश राहुलला संधी देण्याचा त्याचा विचार आहे. राहुल धोनीचे स्थान घेतो की रायुडूचे हे पाहणे रंजक ठरेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अ‍ॅडम झम्पा भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. त्याने धोनी आणि कोहलीला वारंवार बाद केले आहे.

याशिवाय गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरत असलेला धोकादायक फलंदाज अ‍ॅरोन फिंच याने आपला फॉर्म पुन्हा मिळवला असून त्याला रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना विशेष मेहनत घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, अष्टपैलू मार्कस स्टोइनिस यांच्यासह तळाच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हानही भारतीय गोलंदाजांपुढे असेल. शमीला विश्रांती मिळाल्यास त्याची जागा भुवनेश्वर कुमार घेईल. अशावेळी डेथ ओव्हर्समध्ये एकाचवेळी बुमराह-भुवी यांचा सामना करणे आॅसीसाठी आव्हानात्मक ठरेल. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि ऋषभ पंत.

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, पीटर हँडस्कोम्ब, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, झाय रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा, अँड्र्यू टाय, पॅॅट कमिन्स, नॅथन कूल्टर-नाइल, अ‍ॅलेक्स केरी, नॅथन लियोन आणि जेसन बेहरेनडोर्फ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here