भारत-ऑस्ट्रेलिया मालिका विजयासाठी भिडणार

0

 

नवी दिल्ली : गेल्या चार लढतींमध्ये विश्वचषक स्पर्धेसाठी संघ संयोजनाचे समीकरण तयार होण्याऐवजी बिघडल्यानंतर, आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बुधवारी पाचव्या व अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात मालिका जिंकण्याच्या निर्धाराने फिरोजशाह कोटला मैदानावर उतरेल.

या मालिकेआधी इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरु होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात केवळ दोन स्थान निश्चित करायचे आहे, असे मानले जात होते. पण गेल्या चार सामन्यांमध्ये संघाच्या काही उणिवा चव्हाट्यावर आल्याने संघ संयोजनाबाबत अस्पष्टता आहे. पण संघ व्यवस्थापनाला योग्य वेळी सर्व बाजूंवर विचार करण्याची संधी मिळणार असल्याची चांगली बाब आहे.

पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविल्यानंतर भारतीय संघाकडे प्रयोग करण्याची चांगली संधी होती. पण त्यानंतर भारतीय संघाने दोन्ही सामने गमावल्यामुळे पाचवी लढत निर्णायक ठरली आहे. अशा पस्थितीत विराट कोहली अँड कंपनीचे मुख्य लक्ष्य मालिका विजय आहे. कारण भारतीय संघ गेल्या तीन वर्षांतील आपला शानदार रेकॉर्ड कायम राखण्यास प्रयत्नशील राहील. भारताने गेल्या तीन वर्षांत ज्या १३ द्विपक्षीय मालिकांपैकी १२ मालिकांमध्ये विजय मिळविला आहे.

मोहालीमध्ये ३५९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम नोंदविणारा ऑस्ट्रेलिया संघ आता दोन सामने गमावल्यानंतर मालिका जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या संघाच्या विशेष श्रेणीत स्थान मिळविण्यास उत्सुक आहे. पण कोटलाच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर त्यांच्या फलंदाजांची परीक्षा ठरेल.

मालिकेपूर्वी भारताच्या विश्वचषक संघातील १३ स्थान निश्चित असल्याचे वाटत होते. पण अंबाती रायुडूचे अपयश, रिषभ पंतची यष्टिपाठी निराशाजनक कामगिरी, के.एल. राहुलमध्ये सातत्याचा अभाव व युझवेंद्र चहलचे अपयश यामुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली. कोहली गेल्या लढतीत चौथ्या स्थानी फलंदाजीला आला. पण या निर्णायक लढतीत तो गृहमैदानावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. तसेच राहुललाहीस् संधी मिळू शकते.

शिखर धवनला गवसलेला सूर भारतासाठी चांगले वृत्त आहे. संघाला कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. त्याने कोटलावर एकदिवसीय व कसोटीमध्ये प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. पंत प्रथमच घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास उतरेल. तो ही लढत संस्मरणीय ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहील. भुवनेश्वर कुमारने गेल्या लढतीत डेथ ओव्हर्समध्ये निराश केले होते. मोहम्मद शमी तंदुरुस्त झाल्यास या महत्त्वाच्या लढतीसाठी त्याला संधी मिळू शकते.

दुसरीकडे, विश्वचषक स्पर्धेपूर्वी हा ऑसी संघ शानदार भासत आहे. आघाडीच्या फळीत कर्णधार अ‍ॅरोन फिंच व शॉन मार्श यांच्या खेळीतील सातत्याचा अभाव संघासाठी चिंतेचा विषय आहे. पण मधल्या फळीत पीटर हँड््सकोम्ब, ग्लेन मॅक्सवेल व एश्टन टर्नर यांच्या सकारात्मक कामगिरीमुळे संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे.

कोटलावरील आकडेवारी भारताच्या बाजूने
जवळपास दशकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया फिरोजशाह कोटलावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भिडतील. याआधी आॅक्टोबर २००९ मध्ये उभय संघ येथे खेळले होते. फिरोजशाह कोटलावर भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात चार एकदिवसीय सामने झाले आणि त्यात भारताचे पारडे जड दिसत आहे.
भारताने चारपैकी तीन सामन्यांत विजय मिळविला असल्याने आॅसी कर्णधार अ‍ॅरोन फिंचवरील दबाव वाढला आहे. २ आॅक्टोबर १९८६ रोजी पहिल्यांदा उभय संघ येथे भिडले होते आणि त्यात भारताने ३ बळींनी विजय मिळविला होता. त्यानंतर १९८७ मध्ये भारताने ५६ धावांनी बाजी मारली.

प्रतिस्पर्धी संघ
भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि रिषभ पंत.
आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकोम्ब, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एश्टन टर्नर, जॉय रिचर्डसन, एडम जम्पा, अँड्य्रू टाय, पॅट कमिन्स, नॅथन कूल्टर नाईल, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन लियोन आणि जेसन बेहरेनडोर्फ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here