न्युझीलंड विरूध्द एकदिवशीय मालिकेत भारताची विजयी आघाडी

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने दिलेलं २४४ धावांचं आव्हान भारताने सहज पूर्ण केलं. विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने ६२ तर कोहलीने ६० धावा केल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

न्यूझीलंडच्या भूमीवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला तब्बल एका दशकाची वाट पहावी लागली. २००८-०९ साली भारताने न्यूझीलंडमध्ये ३-१ च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने २ तर मिचेल सँटनरने १ बळी घेतला.

रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने तिसऱ्या वन-डे सामन्यात ४९ षटकात २४३ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी रॉस टेलरने ९३ तर टॉम लॅथमने ५१ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने काहीकाळ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.

यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. दोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी झाल्यानंतर टॉम लॅथम माघारी परतला. यानंतर सावरलेला न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतल्यामुळे भारतीय संघाने सामन्यावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलं. तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला २४३ धावांचं लक्ष्य गाठून दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने ३ बळी घेतले, त्याला हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी २-२ आणि भुवनेश्वरने १ बळी घेत चांगली साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here